The mystery behind the celebrated Indian painter and artist Raja Ravi Varma and his hometown Kilimanur | किलिमानूरची गोष्ट.
किलिमानूरची गोष्ट.

ठळक मुद्देकिलिमानूरची स्वत:चीही एक गोष्ट आहे. रविवर्मा जन्मण्याच्या अनेक शतकं आधी सुरू झालेली. मृत्यूनंतर सव्वाशे वर्षांनंतरही रविवर्मांची गोष्ट अजूनही संपलेली नाही. किलिमानूरचीही नाही.

- शर्मिला फडके

रविवर्मा या चित्नकारावर मी आजवर अनेकदा लिहिलं, त्याचा चित्न-प्रवास, मॉडेल्स, मुंबईतलं वास्तव्य, प्रेस, भाऊ राजावर्मा. त्याच्या प्रवासमार्गावरून बर्‍यापैकी फिरूनही झालं. पण रविवर्मा नावाशी जोडलं गेलेलं गूढ उकलत नव्हतं, एका विशिष्ट दालनाची किल्ली अजूनही सापडत नाही, त्यामधे प्रवेश मिळत नाही अशी अस्वस्थता सतत मनात होती. रविवर्मा- एक चित्नकार, व्यक्ती यातलं काहीतरी मूलभूत अजूनही उमगत नव्हतं. त्याच्या पौराणिक, धार्मिक चित्ननिर्मितीमागची, निवडलेल्या विषयांमागची प्रेरणा, त्याने भारतीय देवतांचं चित्नण करताना वापरलेलं किंवा उचललेलं पाश्चात्त्य तंत्न, त्यावर उमटवलेला स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा, त्याच्या चित्नातल्या व्यक्तिरेखांच्या चेहर्‍यावरची एक्सप्रेशन्स, हावभाव, वस्र-दागिन्यांच्या लोभस चित्नीकरणातला झळाळ, जो आज दीडशे वर्षांनंतरही जराही उणावलेला नाही.. हे सगळं नेमकं आलं कुठून? नेमकं काय, काय काय शिल्लक होतं अजून रविवर्माबद्दल कळून घेण्यासारखं याचा तरी उलगडा होणं गरजेचं होतं. टोकाची स्तुती आणि टीका वाट्याला आलेला बहुधा हा एकमेव कलाकार, मृत्यूनंतर सव्वाशे वर्षांनंतरही लोकप्रियतेचं वलय आणि गूढ जराही कमी झालेलं नाही, पुढेही होणार नाही याची ग्वाही वाटणारा असाही हा एकमेवच. त्याकरताच त्याच्या जन्मस्थानी, किलिमानूरला जाणं गरजेचं वाटलं. 
रविवर्मांची गोष्ट सुरू होते किलिमानूरला. ते त्यांचं जन्मस्थान.
किलिमानूरची स्वत:चीही एक गोष्ट आहे. रविवर्मा जन्मण्याच्या अनेक शतकं आधी सुरू झालेली. मृत्यूनंतर सव्वाशे वर्षांनंतरही रविवर्मांची गोष्ट अजूनही संपलेली नाही. किलिमानूरचीही नाही.   
किलिमानूरची स्वत:ची गोष्ट रविवर्मांच्या जन्माच्याही कितीतरी शतकं  आधी सुरू झाली.
किलिमानूरच्या राजवाड्याचा रस्ता उतरत्या, चिंचोळ्या, आत आत वळत जाणार्‍या पायवाटेचा. एका बाजूला अक्षरश: अस्ताव्यस्त रान आणि दुसर्‍या बाजूला गर्द, सावळट हिरवी भातशेती, नारळाची, फणसाची, केळीची झाडं. ही सगळी राजवाड्याचीच जमीन आहे, आणि हे अस्ताव्यस्त रान म्हणजे अनेक शतकांपासूनची यक्षीची अस्पर्श देवराई, हे रस्त्याचं प्रदीर्घ वळण संपल्यानंतर समोर आलेल्या प्राचीन, लोखंडी फाटकावरील पाटीमुळे कळलं. आत एक मोकळं मैदान, अतिप्रचंड, पुरातन पिंपळाच्या झाडाचा लाल, दगडी पार.  समोर कोवळ्या पोपटी रंगातला भातशेतीचा समुद्र आणि डाव्या बाजूला समोरच किलिमानूरच्या राजवाड्याची आजवर अनेक फोटो-चित्नांमधून पाहिलेली पांढरीशुभ्र, डौलदार कमान. कमानीच्या आत एक वेगळंच जग. अतिशय देखणं लॅण्डस्केपिंग. विशाल प्रांगण आणि त्यापलीकडे हिरव्यागार वृक्षांच्या दाटीमध्ये मोठय़ा विस्तारावर उभी असलेली अनेक बैठी, एकमजली शुभ्र घरं. 
दाट जंगलाचा बॅकड्रॉप. फणसाची लगडलेली झाडे, मंदार वृक्षांची रांग.
आवाज फक्त गळणार्‍या पानांचा आणि वार्‍याचा.  लाल फरशांची जमीन. शुभ्र रांगोळी, रुंद ओटे, लाकडी खांब, नक्षीदार, भव्य दरवाजे. राजा रविवर्मांचे हे मातृकुल. कमानीसमोरचा पिंपळाचा वृक्ष जितका जुना आहे तितकाच हा राजवाडाही.
हा वृक्ष प्राचीन स्मृतिस्थान आहे, मलाबार कालगणनेच्या 9903व्या वर्षी, इसवी सन 1728 साली या पिंपळ वृक्षाचे रोपण झाल्याची नोंद राजवाड्याच्या पायाचा दगड उभारला त्यावेळी पिंपळाच्या दगडी पारावर केली गेली. आजही ती तिथे आहे. मार्तंंड वर्मांच्या हस्ताक्षरांमध्ये, घराण्याच्या पोथीमध्येही हे नोंदवलं गेलं. ही पोथी किलिमानूरच्या पोथीशालेमध्ये लाल बासनात गेली तीनशे वर्षंं सुरक्षित आहे. 
राजवाड्याच्या खासगी भागात, जिथे एकेकाळी नाट्यशाला होती, तिथल्या दगडी बाकावर मी बसले. दारात बकुळीचा प्रचंड मोठा वृक्ष. खाली ओल्या, लाल फरशीवर बकुळ फुलांचा नुसता खच पडला होता. 
पाचशे वर्षांंचा प्राचीन इतिहास या जागेला आहे.  1740 साली डचांनी वेनाडवर हल्ला केल्यावर त्यांच्या विरोधात किलिमानूरच्या मार्तंंड आणि धर्मा-वर्मांंनी कडवा लढा दिला आणि पराभव केला. विजय लहान असला तरी भारतीय सैन्याने युरोपिअन सैन्याला पराभूत केल्याचं हे पहिलंच उदाहरण. या विजयाबद्दल मार्तंंड वर्मांंना 1753 साली किलिमानूरला स्वायत्तता दिली गेली. याच घराण्यातील वेलू थंपी दालावा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात राजवाड्यामध्ये अनेक गुप्त सभा घेतल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिशांविरु द्धच्या लढय़ात ते धारातीर्थी पडले. त्यांची तलवार राजवाड्यातर्फे भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना सुपुर्द करण्यात आली; जी आता दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.  
अशा पुरातन आणि आजही नांदत्या वास्तूने अनेक शौर्यकथा, दंतकथा, पुराणकथांना जन्म दिला. दर पिढीगणीक त्यांच्यात भर पडत गेली नसली तरच नवल. 
राजा रविवर्मांंनंतरच्या सहाव्या पिढीतले त्यांचे वारसदार, किलिमानूर पॅलेस ट्रस्टचे विश्वस्त रामावर्मांंकडे अशा अनेक कहाण्या आहेत. मूळ पुरु ष कोइल थंपुरन मार्तंंड वर्मांंच्या घराण्यात 131 वर्षांंंपूर्वी जन्माला आलेल्या राजा रविवर्मा या जगविख्यात चित्नकाराच्या बाबतीतल्या या सर्व गोष्टी, कहाण्या मला ऐकायच्या आहेत. राजा रविवर्मांंच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचं गूढ वलय, त्यांच्या संदर्भातल्या काही अनाकलनीय गोष्टींना सामावून घेतलेल्या बंदिस्त दालनाची किल्ली मला त्यातूनच गवसणार आहे.
वाचा यंदाचा लोकमत दीपोत्सव. कदाचित ही सोन्याची किल्ली तुम्हालाच गवसून जाईल..
sharmilaphadke@gmail.com
(लेखिका ज्येष्ठ कला समीक्षक आहेत.)

.............................................

दीपोत्सव 2019
पाने 240 : मूल्य 200 रुपये : प्रसिद्ध झाला!!
......................................
अंकाविषयी अधिक माहिती 
deepotsav.lokmat.com
1. ऑनलाइन खरेदी : deepotsav.lokmat.com
2. व्हॉट्सअँप मेसेज पाठवून प्रत मिळवा : 955-255-0080
3. ई-मेल : sales.deepotsav@lokmat.com

Web Title: The mystery behind the celebrated Indian painter and artist Raja Ravi Varma and his hometown Kilimanur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.