कुपोषण सुटले, आरोग्य मात्र बिघडले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 07:00 IST2019-06-30T07:00:00+5:302019-06-30T07:00:09+5:30
मेळघाटातल्या स्थलांतरीत झालेल्या गावांची व्यथा...

कुपोषण सुटले, आरोग्य मात्र बिघडले..!
- गजानन दिवाण-
जंगलाच्या बाहेर पुनर्वसन झाल्यावर गावांचा कुपोषणाचा प्रश्न तर मिटला, पण दुषित पाण्यानं अनेक आजार पाठीशी लागले.जंगलात मका आणि जवारीची भाकरी मिळायची. इथे रेशनचा गहू अन् तांदूळ. तो कसा पचणार? आदिवासींच्या घराघरात मोहाची दारू तयार व्हायची, पण विकतच्या भेसळ दारुनं त्यांना दवाखाना दाखवला. मात्र त्यांची फी भरण्याची ताकद कोणाकडे आहे?
...........................
साधारण आठ-नऊ वर्षांपूर्वी जंगल कायमचे सुटले. दवाखाना जवळ आला. शाळा हाकेवर आली. गावात रोज एसटी येऊ लागली. आदिवासी गावाने वीज पहिल्यांदाच पाहिली. टीव्ही, डिश अॅन्टिना, गाड्या-घोडे, मोबाईलसह आणखी बरेच काही आले. कुपोषणातूनही सुटका झाली. वनवास संपला, असे वाटले. मात्र, घडले भलतेच. घरागणिक माणसे आजारी पडू लागली. मरू लागली. मिळालेला पैसा दवाखान्यातच गेला. शरीर काटक होते. आजारपणाने तेही खचले...
बारूखेड्यातील बन्सी बेठेकर यांची ही व्यथा. ती त्यांची एकट्याची नव्हती. पूनर्वसन झालेल्या अनेक गावांतील अनेक घरात हेच चित्र. २०११ पूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाढलेले हे गाव.
पुनर्वसन मोहिमेंतर्गत पात्र ठरलेल्या प्रत्येकाला शासनाकडून दहा लाख रुपये मिळाले.
पुनर्वसनानंतर ही दोन्ही गावे अकोट (जि. अकोला) तालुक्यातील वारी गावाजवळ वसली. गावाच्या उशालाच वाण धरण. पैसा मिळाला. पाण्याची सोय झाली. दळणवळण सोयीचे झाले. शाळा-दवाखाना, बाजार अगदी कुठलीच चिंता राहिली नाही. वनवास संपला, असे या आदिवासींना वाटले. मात्र, घडले भलतेच.
३० बाय ४५ फुटांची जागा प्रत्येकाला मिळाली. घरे मात्र स्वत:च बांधायची होती. वीज-रस्त्याची सोय शासनाने करून दिली होती. काही लोकांनी साधी कुडाची घरे बांधली, काहींनी पत्र्याची. काहींनी टीव्ही घेतला, डिश घेतली. एक-दोघांनी तर फ्रीजही घेतला. दुचाकी तर जवळपास प्रत्येकानेच घेतली. गवळी सोडले तर शेती कोणीच घेतली नाही. गवळ्यांची घरे बोटांवर मोजण्याइतकी. काय झाले? आज गवळी सोडले, तर कोणीच समाधानी नाही.
बारूखेडा आणि नागरतास ही गट ग्रामपंचायत. आज नागरतासची लोकसंख्या ३३६, तर बारूखेड्याची ६४० आहे. ग्रामपंचायत बांधण्यासाठी १४ लाख रुपये मिळाले आहेत. त्या पैशांतून बांधकामही सुरू आहे. २०१६ साली ही ग्रामपंचायत स्थापन झाली. तेव्हापासून पंचायतीला मिळालेला एवढाच निधी. जया पाठक ही २२ वर्षांची तरुणी या गावची सरपंच. बी.ए.पर्यंत शिकलेली. गावात दहावीच्या पुढे शिकलेली ती एकमेव. मागच्याच वर्षी तिचे लग्न झाले. बाजूचेच मोरघडी हे तिचे सासर. सरपंच असल्याने ती इथेच राहते. रत्नाबाई काळमेघ या इथल्या अंगणवाडीताई. काळमेघ हे त्यांचे माहेरचे आडनाव. सासरचे आडनाव पाठक. सरपंच असलेल्या जयाची ती आई. अख्ख्या गावात यांचेच घर खाऊन-पिऊन समाधानी दिसले. राहणीमानही शहरात शोभेल असेच. बाकी सारे गाव आदिवासी पाडा शोभत होते. कुडाची जागा चांगल्या घरांनी आणि घरासमोर जनावरांची जागा दुचाकींनी घेतलेली.
दोन्ही गावच्या दोन अंगणवाड्या. बारूखेड्याची अंगणवाडी पाठकबार्इंकडे, तर नागरतासची मुन्नीबाई गवते यांच्याकडे. गवतेबाईंचा मुलगा दहावीला असल्याने त्या हिवरखेडलाच राहतात. गावाजवळच म्हणजे अगदी लागून वारीत आठवीपर्यंतच शाळा आहे. नागरतासच्या अंगणवाडीत ४०, तर बारूखेडला ११५ मुले. यातील एकही मूल कुपोषित नाही.
रत्नाबाई म्हणाल्या, ‘कुपोषित असण्याचे कारणच नाही. इथे सारे काही वेळेवर मिळते बघा. जंगलात असताना त्याचीच मारामार होती. मग काय कुपोषण पाचवीलाच पुजलेले.
हितं जंगलाबाहेर सगळंच वेळेवर, म्हणजे खिचडी, उसळ भेटते. महिन्याला कुठलातरी अधिकारी येऊन तपासणी करतो. गरोदर मातांचीही काळजी घेतली जाते. गावातच स्वस्त धान्य दुकान आहे. तिथे धान्य भेटते. अडचण कुठलीच नाही.’
कुपोषणातून तर मुक्ती झाली; पण आमचे आरोग्य बिघडले बघा...रत्नाबाईंना थांबवत मध्येच श्यामराव कासदेकर बोलले.
श्यामराव या गावचे उपसरपंच. पुनर्वसनानंतर दहा लाख रुपये मिळाले. पत्नीला किडनीचा आजार जडला. त्यांचे साडेतीन लाख रुपये दवाखान्यातच गेले. वन विभागाने पुनर्वसनानंतर त्यांना पिठाची चक्की आणि मंगलकार्याला भाड्याने देण्यासाठी काही भांडीकुंडी दिली होती. आज त्यावरच त्यांचे भागते आहे.
पुनर्वसन झाल्यानंतर सुरुवातीला गावात पाण्याची सोय नव्हती. शेजारी असलेल्या वाण धरणावरच गावची तहान भागायची. हे पाणी भलतेच जड. या पाण्यानेच गावकऱ्यांचे आरोग्य बिघडविले, हा या गावकऱ्यांचा दावा.
गजानन महाराजांच्या शेगावला पाणीपुरवठा होतो, तो याच वाण धरणातून. हे सांगताच गावकरी म्हणाले, त्यांना फिल्टर होऊन पाणी जाते.
आमच्यासाठी कुठे होते फिल्टर?
आता ग्रामपंचायतीने गावातच बोअर घेतला आहे. सकाळी १० वाजता प्रत्येकाच्या नळाला पाणी येते. सांडपाण्यासाठी गावात हातपंपही आहे. आता पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे सरपंच जयाने सांगितले.
दवाखाने जवळ आले असले तरी आदिवासींचा भुमकाबाबावरील विश्वास काही कमी झाला नाही. या गावातही तो दिसला. अजूनही आदिवासींवर तोच उपचार करतो. डागण्या देतो. यातूनही न सावरला तोच दवाखान्यात जातो.
गावाच्या मागे लागलेले आजारपण सांगताना साठीतले बन्सी बेठेकर वैतागून म्हणाले, ‘८३ लोकांना गिळले या दूषित पाण्याने. कोणी मलेरियाने गेला, तर कोणी काविळीने. दोन्ही गावांत मिळून गेल्या आठ वर्षांत वेगवेगळ्या आजारपणांत अनेक लोक मेले. माझ्याच शेजारी राहणाऱ्यां बेठेकरच्या घरी तर एकाच वर्षांत सहा जण मेले. आता म्हातारी अन् एक पोरगा तेवढा शिल्लक राहिलाय.’
आता तर पाणी मिळते आहे. मग अजूनही आजारपण बाकी कसे, यावर बेठेकर म्हणाले, ‘जंगलात होतो तव्हा मोहाची कोरी भेटायची. आम्हीच तयार गाळायचो ती. आताही भेटते; पण विकत. तीही मिक्स. नवसागर, केमिकल काय काय मिसळत्यात ते त्यांनाच ठाऊक. एका झटक्यात चढते बघा.’
आजारपण वाढण्याचे हे दुसरे मोठे कारण.
जंगलात असताना मक्याची आणि जवारीची भाकरी मिळायची. इथे रेशनवर धान्य मिळते; पण गहू अन् तांदूळ. भाकर खाणारं पोट गहू कसं पचवेल, हा या गावकºयांचा सवाल.
आजारपण वाढण्याचे हे तिसरे कारण.
‘जंगलात कोणाला सर्दी झाली की खेकडा खायचा. अर्ध्या तासात सर्दी गायब. अशी जंगलात कितीतरी औषधी होती. इथे सर्दी-खोकल्यालाही दवाखान्यात जावं लागतं. पैसा कसा पुरल?’
त्यामुळे झाले काय? - कुपोषणातून सुटका झाली. मात्र, अनेक आजारांनी पकडले. हातातले पैसे संपले आणि काबाडकष्ट करणारे शरीरही थकले.
आता जगायचे कसे, हा त्यांचा सवाल. त्याचे उत्तर ना या आदिवासींकडे आहे ना सरकारी यंत्रणेकडे!
.......