शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

प्रवासी चित्रकार रविवर्मा : डायरीतून उलगडली शतकापूर्वीची स्थित्यंतरं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 3:50 AM

राजा रविवर्मा हा भारतातला पहिला आधुनिक आणि प्रवासी चित्रकार. प्रवासाची फारशी साधनं नसतानाही तब्बल ७३०० मैलांचा प्रवास त्यानं केला. या प्रवासानं त्याचा केवळ पोषाखच बदलला नाही, चित्रकलेचा आधुनिक आविष्कारही त्यानं स्वीकारला.

- शर्मिला फडके

राजा रविवर्मा कोण याचं उत्तर आज भारतातला सामान्य माणूसही सहज देऊ शकतो. नावामागे ‘विख्यात चित्रकार’ अशी उपाधी लावायचीही आज गरज नाही इतकी त्याची ओळख अजरामर आहे. भारतातला पहिला आधुनिक चित्रकार या उपाधीला साजेशी रविवर्माची अजून एक ओळख म्हणजे हा भारतातला पहिला प्रवासी चित्रकार. चित्रकलेकरता, विशेषत: पोर्टेट पेंटिंगच्या कामाकरता तो सातत्याने भारतभरात फिरला, प्रदर्शनांच्या निमित्ताने परदेशात गेला. या प्रवासाचे तपशीलवार दस्तावेजीकरणही झाले. भारतीय कला-इतिहासाच्या दृष्टीने दुर्मीळ असलेली ही गोष्ट शक्य झाली, रविवर्माचा धाकटा भाऊ आणि सहप्रवासी असलेल्या राजावर्माच्या प्रवासी रोजनिशी लिहिण्याच्या सवयीमुळे.१८७८ साली रविवर्माने चित्र काढण्याकरता भारतभरातला आपला पहिला, दीर्घकालीन प्रवासाचा दौरा सुरू केला. एकशेचाळीस वर्षांपूर्वीचा, त्याकाळात नवलाईचा असलेला रेल्वे प्रवास, तोही लांब पल्ल्याचा. प्रवास निश्चितच सोपा नव्हता.

याच प्रवासात राजावर्माने डायरी लिहायला सुरुवात केली. पाच महिन्यांचा हा विविधरंगी; पण दगदगीच्या प्रवास संपत असताना तो लिहितो- ‘या प्रवासात आम्ही चार मोठी संस्थानं, उत्तर भारतातली काही महत्त्वाची, मनोवेधक शहरं आणि दार्जिलिंग हे देखणं थंड हवेचं ठिकाण पाहिलं. आम्ही रस्त्याने १२५ मैलांचा, रेल्वेने ७००० मैलांचा आणि पाण्यावरचा २०० मैलांचा प्रवास केला. एकूण ७३०० मैलांचा हा प्रवास होता.’कर्मठ, पारंपरिक वातावरणातून पहिल्यांदाच सफरीकरता बाहेर पडलेले वर्माबंधू. फार मोठ्या सांस्कृतिक बदलाचा त्यांना सामना करावा लागला.

मुंबईत आल्यावर वर्माबंधूंनी आपल्या पारंपरिक पोषाखाचा त्याग केला आणि आधुनिक, पाश्चात्त्य पोषाख स्वीकारला. हा फार मोठा बदल होता आणि तो फक्त वरवरचा पोषाखी बदल नव्हता. नव्या गोष्टी, तंत्रज्ञान, आधुनिक विचारही त्यांनी सर्वार्थाने आत्मसात केले. इतकंच नव्हे तर त्यांचा आविष्कार आपल्या चित्रकलेतूनही केला. दोघेही सौंदर्याचे, नव्या अनुभवांचे भोक्ते होते. उत्तम संवादाची त्यांना आस होती, नव्याने भेटलेल्या लोकांबद्दल जाणून घ्यायला ते उत्सुक असत. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटकांचा ते आस्वाद घेत. या संगीतप्रेमातूनच १८९९मध्ये रविवर्मांचा गानसरस्वती अंजनीबाई मालपेकरांशी मुंबईत परिचय झाला. स्नेह दाट झाला. याच अंजनीबार्इंचा चेहरा पुढे त्यांच्या अनेक महत्त्वाच्या चित्रांमध्ये दिसला.

ब्रिटिश अमलाखालील भारतामध्ये आधुनिकतेचे वारे वाहत होते, सामाजिक सुधारणा होत होत्या. दोघांनीही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहारांमध्ये पारंपरिकता आणि आधुनिकतेची सांगड सहजतेनं घातली. नव्या प्रयोगांना दूर सारणारी कलेतली कर्मठता त्यांच्यात नव्हती. लोकप्रिय होऊ लागलेल्या छायाचित्रणकलेचे महत्त्व, फायदा आणि छपाई माध्यमातले त्याचे अपरिहार्य स्थान त्यांना लगेच उमगले. म्हणूनच आपल्या पोट्रेट पेंटिंगमध्ये त्यांनी फोटोग्राफीचा चपखल वापर करून घेतला. मॉडेलची बसण्याची, उभं राहाण्याची ढब, कपडे, दागिने, त्याच बरोबर मागच्या पार्श्वभूमीच्या चित्रणातले नैसर्गिक सौंदर्य, विशेष देखणेपणा चित्रात उतरवण्याच्या रविवर्माच्या खास वैशिष्ट्याला छायाचित्रणकलेच्या अचूक वापराची मौल्यवान जोड मिळाली.

रोजनिशीत सर्वात बहारदार वर्णन आहे मुंबईच्या वास्तव्याचे. मुंबईत केलेली चित्रकलेच्या साहित्याची खरेदी, पारशी, मराठी धनिकांकडून मिळालेल्या भेटी, फोर्टमध्ये केलेल्या खरेदीचे तपशील, मरिन ड्राइव्हच्या ‘एकांत’ रस्त्याने मारलेला समुद्रावरील फेरफटका, बॅलार्ड पिएरची निरीक्षणे, रविवर्माला त्याच्या चित्रांकरता न्यूड मॉडेलिंग करायला वेश्यांनी दिलेला नकार, नाटकं, संगीत-नृत्याच्या मैफली.. अशा तपशिलांमधून दीडशे वर्षांपूर्वीच्या मुंबईतले सामाजिक-सांस्कृतिक वातावरण जिवंत होते. मुंबईतले रविवार कंटाळवाणे जात असल्याची तक्र ार राजावर्मा करतो, कारण रविवारी वर्तमानपत्रे घरपोच मिळत नसत.

कमिशन्ड पोर्टेट करताना रविवर्माला येणा-या अडचणींबद्दल राजावर्मा लिहितो, उदा. मुंबईच्या दमट हवेत आॅइलपेंट्स लवकर वाळत नाहीत.पोर्टेट काढून घ्यायला आलेली व्यक्ती आपला चेहरा जास्तीत जास्त सुंदर आणि तरुण चित्रित केला जावा म्हणून आग्रही असत त्याचा रविवर्माला त्रास होतो, आणि म्हणून प्रत्यक्ष बैठकीपेक्षा छायाचित्रांवरून पोर्टेट करणे रविवर्माला जास्त पसंत आहे असं तो लिहितो.रविवर्माने मुंबईत आणि मळवलीला उभारलेली ‘द रविवर्मा फाइन आर्ट लिथोग्राफकी प्रेस’ हा त्याच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा, उद्यमशील भाग. आधुनिक भारताच्या कलाविषयक दृष्टिकोनांमध्ये मूलभूत बदल घडवून आणणारी ही घटना. प्रेसच्या उभारणीचा १८९४ ते १९०५ पर्यंतचा काळ, त्याची पूर्ण प्रक्रिया राजावर्मा आपल्या रोजनिशीत तपशीलवार लिहितो. प्रेसची उभारणी, तिथला कारभार, आर्थिक संकटे, चित्रविक्री इत्यादी नोंदी काळजीपूर्वक केल्या आहेत.

या सर्व प्रवासकालीन रोजनिशीत नातेवाइकांचा अगदी मोजका उल्लेख आहे. रविवर्माचे थोरले काका, जे त्याचे मार्गदर्शक होते, त्यांचे त्रावणकोरला १८८३ साली निधन झाले तेव्हा रविवर्मा खूप दु:खी झाला, असा उल्लेख राजावर्मा करतो. राजावर्माने आपल्या भावाचे त्या काळात एक पोर्टेट केले. त्यात हा शोकमग्न रविवर्मा दिसतो. उदास, दु:खी चेह-याचा, दाढीचे खुंट चेह-यावर वागवणारा. त्रावणकोरच्या घरातल्या दोन बायकांचा, ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रदीर्घ काळ नव-याची वाट पहाण्यातच घालवला त्यांचा फक्त एक उल्लेख डायरीत आहे. बाकी वैवाहिक आयुष्याबद्दल काहीही नाही. नायर घराण्याचा इतिहास असलेल्या एका पुस्तकात उल्लेख आहे की शेवटच्या आजारपणात राजावर्माला आपण पत्नीकडे केलेल्या दुर्लक्षाचा खूप पश्चाताप होत होता.

दोन्ही भावांच्या या सुंदर साहचर्याचा, एकत्रित प्रवासाचा अखेर शेवट झाला. डायरीतल्या प्रवासी नोंदी आकस्मिक, अर्धवटच थांबल्या. बंगलोर येथे आतड्यावर झालेल्या शस्रक्रियेनंतर ४ जानेवारी, १९०५ रोजी राजावर्माचे निधन झाले. आयुष्यभर ज्याने सावलीसारखी सोबत केली त्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा रविवर्माला फार मोठा धक्का बसला. आयुष्यात प्रथमच, खºया अर्थाने एकाकी पडलेल्या राजा रविवर्माचे पुढच्याच वर्षी, २ आॅक्टोबर, १९०६ रोजी निधन झाले. तत्कालीन समाजाचा आधुनिक कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यावेळी तयार होत होता त्या काळातल्या या नोंदी असल्याने कला-इतिहासासोबतच सांस्कृतिक, समाजशास्त्रीय दृष्ट्याही त्यांना वेगळे महत्त्व आहे.

जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश कलोनियल कालखंडामधलं एका भारतीय अकॅडेमिक पेंटरचं व्यक्तिगत - व्यावसायिक आयुष्य, त्याला मिळालेलं यश, आर्थिक व्यवहार, स्वप्न, अपयश, सामाजिक जीवन या सर्वांचा वेध आज आपल्याला केवळ रविवर्माच्या प्रवासामुळे घेता येऊ शकतो. हे तपशील नसते तर आज रविवर्माचे कितीतरी पैलू, त्याने परिश्रमाने विकसित केलेलं पोर्टेट पेंटिंगचं आधुनिक तंत्र, त्या काळातले कला-व्यवहार सगळं अंधारातच राहिलं असतं. २००५ साली एर्विन न्यूमेयर आणि स्टिन शेलबर्जरच्या संपादनाखाली आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने राजावर्माची ही रोजनिशी इंग्रजी भाषेत प्रकाशित केली. त्यात एकूण ९४०नोंदी आहेत.(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत.sharmilaphadke@gmail.com)