शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 8:13 AM

आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो.

आदिवासींच्या छोट्याशा खेड्यात एकापाठोपाठ एक असे मृत्यू झाले की, प्रत्येक मृत्यूचे कारण शोधून ते दूर करण्याऐवजी, आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो. मंदिरात पूजाअर्चा करणारी गावातील एक महिला व दुसरा पुरुष या दोघांचा जादूटोणा व देवदेवस्कीमुळेच माणसे मरतात, अशा आंधळ्या श्रद्धेचा निष्कर्ष निघतो. दोघांना बेदम मारहाण करून पेट्रोल टाकून जिवंत जाळले जाते. अंगावर शहारे आणणारी ही घटना महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. जननी देवाजी तेलामी व देवू कटिया आतलामी या दोघांना जीव गमवावा लागला. खून तसेच अनिष्ट-अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अंगात सैतान संचारलेल्या त्या झुंडीत महिलेचा पती व मुलगाही आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी त्याच तालुक्यातील जांभिया गावात जादूटोण्याच्याच संशयावरून एका वृद्धाला समाजमंदिरात बांधून मारहाण करण्यात आली. गरम सळईचे चटके देण्यात आले.

महाराष्ट्रदिनीच तिकडे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यात जलोला येथील आशा सेविका ही डाकीण असून, मुलांना खाते, जनावरे खाते असा संशय घेत तिला व पतीला मारहाण झाली. बाजूच्याच गावात वृद्धाला मारहाण झाली. राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये हे जे घडतेय ते सारे भयंकर, चिंताजनक आहेच. शिवाय या सगळ्या घटना पाहून आपण कोणत्या विकासाच्या, एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतो, असा प्रश्न पडावा. त्यासोबतच अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची मुक्तता करण्याचे, त्या दलदलीतून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हान किती मोठे आहे, याचीही कल्पना यावी. बारसेवाड्याच्या घटनेला आणखी एक कंगोरा म्हणजे एरव्ही जातबांधव व भगिनींच्या वैयक्तिक अधिकारांमध्ये नाक खुपसणाऱ्या अंधश्रद्ध जातपंचायती आता जादूटोण्याच्या संशयावरूनही निरपराधांचे जीव घ्यायला लागल्या आहेत. त्याचे कारण हे की, रानावनात राहणाऱ्या, दारिद्र्यात खितपत पडलेल्या या निरक्षर माणसांपर्यंत नव्या जगाचे वारे पोहोचलेले नाही. अवतीभोवती, राज्यात-देशात, जगाच्या कानाकोपऱ्यात झालेला शिक्षणाचा प्रसार त्यांच्या झोपड्यांमध्ये झिरपलेला नाही. शिक्षणामुळे आणि त्यातही विज्ञानामुळे तयार होणारा बुद्धिप्रामाण्यवाद, विवेक, आजार व मृत्यूमागील कार्यकारणभाव यापासून ते दूर आहेत.

अरण्य प्रदेशात, निसर्गाच्या सानिध्यात आपण कोणत्या तरी सहाय्यकारी शक्तीमुळे जिवंत आहोत आणि अशाच कुठल्या तरी विनाशकारी शक्तीमुळे आपल्यावर संकटे येतात, माणसे आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, अशा अनेक अंधश्रद्धांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. हा पगडा वैयक्तिक असतो तेव्हा कुटुंबातल्या, समाजातल्या विवेकवादी मंडळींकडून सुधारणा घडवली जाऊ शकते. लोकशिक्षणाची कवाडे खुली असतात. परंतु, अंधश्रद्धेला जेव्हा समूहाच्या मानसिकतेचे स्वरूप येते तेव्हा झपाटलेल्या झुंडी तयार होतात. या झुंडीचा अधिक राग खेड्यातल्या, पाड्यावरच्या शिकलेल्या मंडळींवर, विशेषत: सुशिक्षित महिलांवर  असतो. कारण, आधुनिक जगाचे दर्शन तसेच अनुभवातून शिकलेल्यांचा विवेक जागा झालेला असतो. ते इतरांनाही सुधारण्याचा प्रयत्न करतात. झुंडीला मात्र ते अजिबात नकोसे असते. त्यातून होणाऱ्या अघोरी कृत्यावेळी त्यात सहभागी झालेल्या कोण्या एकाच्या मनात चुकीचे भान आले तरी तो उघडपणे बोलू शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर तोदेखील झुंडीच्या रागाचा बळी ठरण्याची शक्यता असते.

गडचिरोली किंवा नंदुरबारमधील घटनांकडे असे इतक्या खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे. सातपुड्याच्या पश्चिम टोकावरच्या, नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव किंवा अक्कलकुवा तालुक्यात भयंकर डाकीण प्रथा आहे. ती हाणून पाडण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच प्रशासनाने काही वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. त्यामुळे डाकीण समजून महिलांचे बळी घेण्याच्या, त्यांच्या छळाच्या घटना कमी झाल्या आणि समाजप्रबोधनाचे प्रयत्नही शिथिल झाले. आताच्या घटनांमुळे प्रबोधनाची गती-शक्ती दोन्ही वाढविण्याची गरज आहे. मागास, निरक्षर, दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून घडणाऱ्या या घटना म्हणजे समाजाचा अंधारलेला कोपरा आहे. त्याबद्दल नुसतेच हळहळून, संताप व्यक्त करून किंवा ‘छे, किती बुरसटलेले लोक’ म्हणून नाक मुरडण्याने भागणार नाही. तो अंधार दूर करण्यासाठी प्रत्येकाने लोकप्रबोधनाचा, लोकशिक्षणाचा दिवा पेटविण्याची गरज आहे.