आनंद, नॉर्मल जीवनातला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 08:20 PM2018-10-27T20:20:37+5:302018-10-28T09:09:00+5:30

ललित : सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती.

Enjoyment, normal life! | आनंद, नॉर्मल जीवनातला !

आनंद, नॉर्मल जीवनातला !

googlenewsNext

- सुषमा सांगळे - वनवे

शनिवार सकाळची शाळा असल्यामुळे खूप घाईघाईने आवरून ठीक ६:३० वाजताच मी गाडीत बसले. गाडीत बसल्याक्षणी अंगातून खूप घाम येऊ लागला होता. मुलांचे डबे, ह्यांचा डबा, घरातील सर्व काम आवरून मी शाळेत निघाले होते. खरं म्हणजे माझ्यासारखीच गाडीतील इतर शिक्षिकांचीही परिस्थिती होती. प्रत्येकाचा कुरकुरीचा सूर होता. प्राप्त परिस्थितीवर तसे कोणीही खुश नव्हते. तसे पाहता सर्व गोष्टी सर्वांच्या नॉर्मल होत्या. मी गाडीची काच हळूच वर केली.

सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती. विस्तीर्ण असलेला हायवे मनाच्या कक्षा रुंदावत होता. वनवे ट्रॅकवरून जाणारी आमची गाडी विचारांची दिशा ठरवत होती. रस्त्याच्या बाजूला असलेली गुलाबी, पिवळी फुलझाडे रस्त्याच्या सौंदर्यात भर घालून मोठ्या दिमाखाने  डोलत होती. सर्व गोष्टी तशा रोजच्याच होत्या, पण आजपर्यंत त्या सर्व नॉर्मल गोष्टीकडे माझे लक्ष का गेले नसावे?

खरं म्हणजे या सर्व नॉर्मल गोष्टी एवढ्या सुंदर असूनही आपले त्याकडे मुळीच लक्ष नसते किंवा ते पाहण्याची आपली तयारीही नसते. कारण त्यांना आपण एवढे गृहीत धरलेले असते की त्यांच्यातील आनंद, सौंदर्यच पाहण्याची दृष्टी आपण आपल्या रोजच्या रडगाण्यात विसरून गेलेलो असतो.
‘कसे आहात?’ किंवा ‘कसे चालले आहे?’ असा प्रश्न जरी कोणी आपणास विचारला तर आपण ‘ठीक चाललेय’ अशा पद्धतीचे निरुत्साही उत्तर देऊन रिकामे होतो. खरं म्हणजे ‘मस्त आहे’ किंवा ‘मजेत चाललंय’ म्हणायला या लोकांना काय प्रॉब्लेम असतो. जोपर्यंत नॉर्मल गोष्टी या अ‍ॅब्नॉर्मल होत नाहीत तोपर्यंत आपणास त्या नॉर्मल गोष्टीचे महत्त्व पटलेले नसते.

साधे उदाहरण म्हणजे रोजचा प्रवासच बघा. आपण रोज प्रवास करीत असतो, पण त्यातील आनंद हा आपणाला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत काहीतरी आपल्याला विपरीत घडत नाही. एखाद्याचे असणे आपण अगदी गृहीत धरून चालतो, पण त्याच्या असण्याचा आनंद मात्र आपणास घेता येत नाही. परंतु तेच असणे जेव्हा नसण्यात जमा होते, तेव्हा मात्र त्या व्यक्तीची कमतरता, त्याची आठवण आपल्याला सतावून सोडते. थोडक्यात काय तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद ही भरभरून मिळणारी गोष्ट असूनसुद्धा तिच्या शोधात इतरत्र भटकत चालला आहे.

आपल्याभोवती दररोजच्या जीवनात तशा कितीतरी गोष्टी खूप चांगल्या घडत असतात. आपण आरोग्यसंपन्न जीवन जगत असतो. आपल्याला शरीराकडून कोणताही त्रास होत नसतो. पण याचे महत्त्व हे आपणास तेव्हाच समजू लागते, जेव्हा आपण कोणत्या तरी व्याधीने त्रस्त होतो अन् आपल्याला खाण्यापिण्यापासून प्रत्येक कृतीवर बंधनं लादली जातात.

आपण नॉर्मल आहोत, अ‍ॅब्नॉर्मल नाही. त्यासाठी कृतज्ञता बाळगायला हवी. एक सामान्य माणूस जो देहदिव्य आहे, त्याला प्रत्येक अवयव आहे. जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत, ज्यांनी सामान्य जीवन हे कधीच अनुभवलेले नाही. असे अनेक लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. कित्येकांच्या माथ्यावर छप्परदेखील नाही, अशाही महिला आहेत ज्या सुरक्षित जीवन जगू शकत नाही. कित्येकांना खूप सारे वैभव सुख असून झोपदेखील येत नाही. कधी कधी सामान्य आयुष्य जगणारे हे खूप भाग्यवान असतात. फक्त त्यांना आपल्या चांगल्या भाग्याची जाणीव होत नाही तर काहींना खूप उशीर होतो.

उगवतीचा सूर्य सुंदर आहे. तसाच मावळतीचाही सुरेख आहे. त्याच्या रंगाच्या विविध छटांनी आभाळात रंग भरतात आणि सारे आसमंत रंगात न्हाऊन जाते. संध्यासमयीच्या क्षितिजाच्या निळ्याशार रेषा किती कळत-नकळत अंधाराची चादर ओढून शांत निघून जातात. विस्तीर्ण रस्त्यावरील विजेच्या दिव्यांचेही सौंदर्य  काही कमी नसते. सृष्टीतील या नॉर्मल गोष्टीतसुद्धा केवढा आनंद लपलेला आहे. फक्त आपण तो उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतो. जेव्हा आपण आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीची कदर करतो तेव्हाच आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी येतात.

Web Title: Enjoyment, normal life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.