ब्रँड मोदी - स्वप्नाच्या खरेदी विक्रीची कहाणी

By Admin | Updated: May 23, 2015 17:34 IST2015-05-23T17:34:02+5:302015-05-23T17:34:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दोन दिवसांत वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण करतील. विविध क्षेत्रंत मोदी सरकारच्या यशापयशाचा हिशेब मांडला जात असल्याच्या

Brand Modi - The Story of Dream Shopping | ब्रँड मोदी - स्वप्नाच्या खरेदी विक्रीची कहाणी

ब्रँड मोदी - स्वप्नाच्या खरेदी विक्रीची कहाणी

 - संतोष देसाई

व्यवस्थापकीय संचालक, फ्यूचरब्रॅण्डस इंडिया प्रा. लि. 
गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चेत असलेली, उलट-सुलट मतं मांडली गेलेली संकल्पना म्हणजे  ‘ब्रॅण्ड मोदी’!
गाडय़ांचे, घडय़ाळांचे, सेलफोनचे, संगणकांचे ब्रॅण्ड भारतीयांच्या सवयीचे! एका व्यक्तीचाच ब्रॅण्ड बनवून तो थेट देशाच्या सर्वोच्च स्थानार्पयत पोहोचवणारी प्रक्रिया मात्र या देशाच्या समाजमनाने प्रथमच अनुभवली, म्हणून त्याचे एवढे अप्रूप!
कुठलाही ब्रॅण्ड पोकळीत आकार घेऊ शकत नाही. जाहिरात क्षेत्रच्या परिभाषेत सांगायचे तर एखादा ब्रॅण्ड जेव्हा  यशस्वी होतो तेव्हा त्यामागे एक  महत्त्वाचे कारण असते : गरज! कुठल्यातरी एका वर्गाची, गटाची, किंवा सा:या समाजाचीही त्या त्या वेळची विशिष्ट सामाजिक/मानसिक/भावनिक/ जीवनशैली- विषयक गरज भागवण्यात एखादी वस्तू/सेवा/व्यक्ती यशस्वी ठरते. मग (आणि म्हणूनच) तो ब्रॅण्ड तयार होतो. सातत्याने बदलती घडण असलेल्या आपल्या देशात मुख्य प्रवाहात आलेला नव्या स्वभावाचा वर्ग आणि त्याला हवा असलेला बदल ही एक मोठी  ‘सामाजिक / राजकीय गरज’ तयार झाली आहे. हा वर्ग संख्येने मोठा आहे आणि वाढतो आहे. त्याला जुनी रडगाणी नको आहेत, उदासवाणी वंचित गा:हाणी नको आहेत, कायम हरलेला-पिडलेला-अभावाने नाडलेला अशा रंगात रंगवलेलं स्वत:चं चित्र पाहण्याचीही त्याची इच्छा नाही. या वर्गाला वास्तवाची पूर्ण जाणीव आहे. गरिबी, दु:ख याच्याशी त्याची नीट ओळख आहे. वास्तवाचे चटके त्यालाही बसतात पण म्हणून केवळ वेदनांचंचं दळण दळण्यात आणि राजकीय पक्षांसह व्यवस्थेनं दिलेल्या गरिबी हटावच्या घोषणातही त्याला काहीएक रस उरलेला नाही! - या वर्गाला एक नवीन कहाणी ऐकायची आहे आणि घडवायचीही आहे! 
ती कहाणी आहे प्रगतीची आणि त्या प्रगतीतून येणा:या  स्वप्नांची. दुसरा कुणी येईल आणि आपला उद्धार करेल अशी या वर्गाची भाबडी अपेक्षा नाही आणि तसा काही भ्रमही नाही. आपल्या लढाया आपल्यालाच लढाव्या लागणार आहेत हे व्यावहारिक शहाणपण त्याने खुंटीला टांगलेलं नाही. पण तरीही या वर्गाला ओढ मात्र उज्‍जवल भविष्याच्या स्वप्नांची! आणि त्या दिशेनं चालून पहायची तयारीही आहे.
ज्या समाजानं इतके दिवस स्वप्नांची टवाळी केली त्याच समाजातला हा वर्ग ‘स्वप्न दाखवणा:या’ एका व्यक्तीच्या मागे उभा राहिला, त्याला कारण देशाच्या वाटचालीच्या एका टप्प्यावर तयार झालेली  ‘गरज’!
- ती नेमकी ओळखणारा विचार लगोलग ब्रॅण्ड बनला, यात नवल नाही. ‘अच्छे दिन आनेवाले है’ या वाक्यातला पूर्वार्ध हेच सुचवत होता की, आज नसतीलही चांगले दिवस पण पुढे येतील! जगण्याच्या वरच्या स्तरात सर्वार्थानं सरकण्याचा प्रयत्न करणा:या (अपवर्डली मोबाइल) वर्गाला ही ‘आनेवाली’ संकल्पना अत्यंत जवळची आणि आपलीशी वाटली!!
वास्तव झुगारता येत नसलं तरी त्या वास्तवापासून झडझडून सुटका करून घेत नवीन काही घडवू पाहणा:या एका वर्गाची भावनिक गरज मोदी नावाच्या या ब्रॅण्डनं पूर्णत: भागवली. 
आणखी दोन गोष्टी लागतात ब्रॅण्ड तरण्यासाठी! कोणालाही आकर्षून घेऊ शकेल, असं  आकर्षक रूप आणि कशाच्या बदल्यात काय मिळणार याची स्पष्ट कल्पना!
इतकी र्वष भारतीय राजकारणात ‘अमूकतमूकवर ढमूक फ्री’ असल्या ब्रॅँडिंगची चलती होती. म्हणजे आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला बिजली-सडक-पानी देऊ!
- या राजकीय  ‘व्यवहारात’ देणा:याकडे उपकृततेची भावना होती, त्याभोवती चीड एकवटू लागली आहे, हे मोदी यांचा ब्रॅण्ड घडवणा:यांनी अचूक ओळखलं.
उलट हा नवा ब्रॅण्ड म्हणत होता, मला स्वीकारा, तुमचं आयुष्य बदलेल, जगण्याचा अनुभव बदलेल! आपण सगळे मिळून चांगल्या भविष्याची वाट चालू!
स्वत:ला माय-बाप समजणा:या राजकीय नेत्यांच्या ‘उपकारांच्या’ भाषेला विटलेल्या नव्या वर्गाला ‘आपण सगळे मिळून करू’ हे भावनिक आवाहन वेगळं वाटलं, यात नवल नव्हतं. 
कोण आहे हा वर्ग?
हा एक कल्चरल क्लास आहे.
त्याला सांस्कृतिक मध्यमवर्ग असं म्हणता येईल.
हा वर्ग श्रीमंत नाही, नवश्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय नाही, आणि तो आता ‘मध्यमवर्गीयही’ उरलेला नाही. पूर्वी हा वर्ग संख्येनं नगण्य होता, मुख्य प्रवाहातील राजकारणानं या वर्गाची कधीच दखल घेतली नाही.  कायम दुर्लक्षित असल्याची भावना या वर्गात होतीच. 
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या  निमित्तानं देशात एक मोठ्ठा ‘पॉवर शिफ्ट’ पहायला मिळाला. उच्चभ्रू आणि गरीब, मध्यममार्गी मध्यमवर्गीय आणि नवश्रीमंत मध्यमवर्गीय यांच्यामधला हा उदयोन्मुख वर्ग. त्यांच्या महत्त्वाकांक्षांना मोदी नावाच्या ब्रॅण्डने मनस्वी स्पर्श केला. त्या स्पर्शानं आपल्याही प्रगतीची दारं उघडतील, नव्या संधी मिळतील आणि आपण आपल्या हिमतीवर प्रगतीची स्वप्नं पाहू शकू यावर भरवसा ठेवून  हा वर्ग कधी नव्हे ती एक भूमिका घेऊन मोदींच्या मागे उभा राहिला. राजकारणाची जुनी सगळी गणितंच बदलून या वर्गानं स्वत:च्या प्रगतीसाठी एक नवीन गणित मांडून दाखवलं!
यात ज्या पद्धतीनं मोदींना जनतेसमोर पेश करण्यात आलं, तो अंदाजही भारतीय राजकारणात नवीन होता. समस्यांचं रूपांतर संधीत करण्याची एक नवीन किल्ली आपल्या हाती आहे असं मोदी सांगत होते. ती किल्ली या वर्गाला जास्त आश्वासक वाटली.
त्यांचं प्रचारातलं सूत्रच होतं.
समस्या + संधी + उपाय
समस्या आहेतच हे मान्य करुन त्या समस्येचं रूपांतर संधीत करायचं, आणि उपाय शोधून प्रश्न थेट सोडवूनच टाकायचा हे ते सूत्र. मुख्य म्हणजे तो उपायही साधासुधा नाही, एकदम भव्यदिव्य-लार्जर दॅन लाइफ!
खरंतर मोदी फक्त एक स्वप्न दाखवत होते, प्रगतीचं स्वप्न. तरक्की का सपना! स्वप्न काही मोजता येत नाहीत आणि सगळी स्वप्नं कधी पूर्णही होत नाहीत. ती बदलतात, मोठी होतात. प्रगतीच्या व्याख्याही बदलतात. पण प्रत्येकासाठी आपलं जगणं अजून ‘बेहतर’ करण्याचं स्वप्न मात्र बदलत नाही!
आता सरकार सत्तेत येऊन वर्ष पूर्ण होत असताना ‘स्वप्न पाहणारा’ हाच वर्ग उतावीळ झाला आहे. बदललेल्या दिवसांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आतूर झाला आहे. दुसरीकडे अजूनही मोदी सरकार काही कॅम्पेनच्या मूडमधून बाहेर आलेलं नाही. 
स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचा हिशेब देणं तसं अवघडच. ती अपूर्ण राहिल्याची भावना पसरली तर लोकशाही व्यवस्थेत काय होतं, हे आजवर अनेकदा अनुभवाला आलेलं आहे.
आणखी एक कळीचा मुद्दा मला दिसतो :
जी स्वप्नं दाखवली ती इतकी मोठी, विशाल होती; की प्रत्यक्षात झालेल्या / चालू असलेल्या कामांची उंची त्या अपेक्षांपुढे सदैव लहानच राहील. लहान वाटेल. त्यामुळे नवं सरकार काम करत असलं तरीही लोकांना ते कमी, अपुरंच वाटत राहणार! 
- लोक  म्हणणारच की, वादे तो बडे बडे किए थे!
इथवरच्या कहाणीतला काही तपशील नवा असला, तरी कहाणी काही पूर्णत: अपरिचित नाही. ‘स्वप्नं’ विकणारे राजकीय नेते जगभरात सर्वत्र, सर्व काळातच असतात. आपल्याकडे मोदींच्या निमित्ताने ठळकपणो दिसलेला एक बदल मात्र महत्त्वाचा- या देशात पूर्वीपासून राजकीय स्वप्न विकणारे होतेच, पण आता स्वप्न खरेदी करणारे खरेदीदारही आले आहेत.
कुठलाही ब्रॅण्ड आकाराला येण्यात या खरेदीदारांचाही वाटा मोठा असतोच!
- तर खरेदी करून झाली आहे. आता परीक्षा दोघांचीही- ज्याने स्वप्नं विकली त्याची तर नक्कीच!
- पण खरेदीदारांचीही सुटका नाहीच!
 
(शब्दांकन- मेघना ढोके)
 

Web Title: Brand Modi - The Story of Dream Shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.