१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:18 IST2025-05-21T09:18:42+5:302025-05-21T09:18:42+5:30
एटीएसने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय वेबसाईट हॅक करून भारतविरोधी संदेश टाकल्याचा गंभीर आरोप आहे.

१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सायबर हल्ल्यांमागे असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. यामध्ये जसीम शाहनवाज अन्सारी आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हे दोघेही ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय वेबसाईट्स हॅक करून त्यावर भारतविरोधी संदेश टाकत होते.
'अॅनोन्सेक' टेलिग्राम चॅनेलद्वारे दिले पुरावे
अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाने ‘AnonSec’ नावाचा टेलिग्राम चॅनेल सुरू केला होता. या चॅनेलवर तो स्वतः हॅक केलेल्या २० हून अधिक वेबसाईट्सचे पुरावे, स्क्रीनशॉट्स आणि माहिती शेअर करत होता. त्याच्या पोस्ट्समध्ये भारतविरोधी मजकूर आणि समाजात द्वेष पसरवणाऱ्या संदेशांचा समावेश होता.
शिक्षण थांबले, पण हॅकिंगमध्ये प्राविण्य
दुर्दैवाने, दोघेही बारावीत नापास झाले असूनही, सायबर गुन्हेगारीत तज्ज्ञ असल्याचे एटीएसने माहिती देताना सांगितले. या दोघांनी सोशल मीडियावर पॅलेस्टाईनचा झेंडा लावून आपली भूमिका जाहीरपणे मांडली होती. तसेच, हे दोघेही भारताच्या विविध वेबसाईट्सवर सातत्याने सायबर हल्ले करत असल्याचे समोर आले आहे.
एटीएसकडून तपास सुरू
एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या काळात देशातल्या संवेदनशील वेबसाईट्सवर सतत सायबर हल्ले होत असल्याची माहिती मिळत होती. त्यानंतर ध्रुव जापती यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने नाडियादमधून या सायबर गुन्हेगारांचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान असे आढळले की, जसीम आणि त्याचा साथीदार हे ‘सायबर जिहाद’चा भाग म्हणून कार्यरत होते. त्यांच्या हॅकिंग मोहिमांचा उद्देश भारतीय संस्थांची प्रतिमा मलिन करणे आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे होता. आता पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.