मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
By यदू जोशी | Updated: May 21, 2025 09:47 IST2025-05-21T09:45:10+5:302025-05-21T09:47:05+5:30
राज्य मंत्रिमंडळातील ४२ पैकी ३८ पुरुष तर चार महिला मंत्री आहेत. महिला मंत्र्यांची टक्केवारी केवळ ९.५ आहे.

मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
यदु जोशी -
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील ४२ पैकी २४ म्हणजे तब्बल ५७ टक्के मंत्री हे केवळ सात जिल्ह्यांचे आहेत. १५ जिल्ह्यांमधून एकालाही मंत्रिमंडळात स्थान नाही. याचा अर्थ ४१ टक्के जिल्हे हे मंत्रिपदापासून वंचित आहेत.
राज्यातील तीन जिल्ह्यांत मिळून प्रत्येकी चार या प्रमाणे १२ मंत्री आहेत. चार जिल्हे असे आहेत की जिथे प्रत्येकी तीन मंत्री आहेत. चार जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन मंत्री आहेत. मंत्रिमंडळाच्या रचनेवर नजर टाकली तर जिल्हा असंतुलन लक्षात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या नागपूर जिल्ह्यातून दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून त्यांच्यासह तीन कॅबिनेट मंत्री तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे आहेत, तिथे त्यांच्यासह तीन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहेत. राज्य मंत्रिमंडळातील ४२ पैकी ३८ पुरुष तर चार महिला मंत्री आहेत. महिला मंत्र्यांची टक्केवारी केवळ ९.५ आहे.
नाशिक पालकमंत्रिपद तिढा वाढला
नाशिकमध्ये पाच आमदार असलेल्या भाजपने गिरीश महाजन यांच्यासाठी तर सात आमदार असलेल्या अजित पवार गटाने माणिकराव कोकाटे यांच्यासाठी पालकमंत्रिपद मागितले आहे.
महाजन यांची आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीही केली
होती पण नंतर वाद झाल्याने स्थगिती दिली.
आता अजित पवार गटाकडून छगन भुजबळ हेही दावेदार असतील. त्यामुळे तिढा वाढेल असे दिसते. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा प्रश्न पक्षापुढे आहे.
एकच मंत्री असलेले
जिल्हे १०
अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे-पाटील, बीड- पंकजा मुंडे, मुंबई शहर - मंगलप्रभात लोढा, मुंबई उपनगर - आशिष शेलार, धुळे - जयकुमार रावल, लातूर - बाबासाहेब पाटील, सिंधुदुर्ग - नितेश राणे, बुलडाणा - आकाश फुंडकर, वर्धा - पंकज भोयर, परभणी -मेघना बोर्डीकर
४ मंत्री असलेले जिल्हे
सातारा - शंभूराज देसाई, शिवेंद्राजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील.
नाशिक - छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे
पुणे - अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे, माधुरी मिसाळ
मंत्री नसलेले जिल्हे १५
अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, नांदेड, नंदुरबार, धाराशिव, पालघर, सांगली, सोलापूर, वाशिम.
३ मंत्री असलेले जिल्हे -
नागपूर - देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, ठाणे - एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक, जळगाव - गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे, यवतमाळ - संजय राठोड, प्रा. अशोक उईके, इंद्रनील नाईक
प्रत्येकी दोन मंत्री असलेले जिल्हे ४
छत्रपती संभाजीनगर - अतुल सावे, संजय शिरसाट, कोल्हापूर - हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर,
रायगड - अदिती तटकरे, भरत गोगावले,
रत्नागिरी - उदय सामंत, योगेश कदम