मुलखावेगळी माणसे: सत्यवृक्षाची पूजा बांधणारा निसर्गप्रेमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:22 IST2025-08-24T12:19:05+5:302025-08-24T12:22:59+5:30
Mahesh Khare: चतुरंग संस्थेच्या संस्कारशील परंपरेत वाढलेला डोंबिवलीचा महेश खरे याने बघता-बघता रूढ मार्ग सोडून एका मोठ्या शैक्षणिक कार्यास वाहून घेतले ! ही मोठीच उडी होय.

मुलखावेगळी माणसे: सत्यवृक्षाची पूजा बांधणारा निसर्गप्रेमी
- दिनकर गांगल
चतुरंग संस्थेच्या संस्कारशील परंपरेत वाढलेला डोंबिवलीचा महेश खरे याने बघता-बघता रूढ मार्ग सोडून एका मोठ्या शैक्षणिक कार्यास वाहून घेतले ! ही मोठीच उडी होय. कारण, महेशचे शिक्षण आणि नोकरी व्यवसायकलेशी संबंधित. त्याचा हात चित्रकाराचा, त्याने शिक्षण घेतले ते जेजेमध्ये, डोंबिवलीत व्यवसाय केला तो डिझायनिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचा. त्याने चाकोरी बदलली आणि तो ‘माधवबागे’च्या ‘आरोग्य संस्कार’ मासिकाचा संपादक झाला, तरी त्याची नजर ‘लेआउट’वर खिळलेली असे आणि ‘माधवबागे’चा विस्तार साधण्याच्या किरण भिडेच्या मोहिमांत तो महत्त्वाचा शिलेदार राहिला. त्यानंतर चाचपडण्याचा काळ आला, तेव्हा त्याने डोंबिवली-मुंबईचे शहरी जीवन सोडून दिले. त्याच्या बायकोने - पूनमने त्याला अनुमती दर्शवली आणि तीही खेड्यात काम करू लागली.
महेश बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या सोनदरा दरीतील डोमरीच्या ‘गुरुकुल’ शाळेत निवासी कार्यकर्ता म्हणून गेला. शाळा संचालकांची दृष्टी अभिनव आहे. खेड्यापाड्यांतून आलेली मुले सर्वांगीण तयारीची व्हावीत, अशी संचालकांची धारणा आहे. शाळेला एकोणचाळीस वर्षे झाली आहेत.
महेश हा त्यांना तशाच वृत्तीचा कार्यकर्ता लाभला. शाळेची सुरुवात औदुंबराचा वृक्ष लावून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली होती. तोच धागा पकडून शाळेने वृक्षसंवर्धन हा त्यांचा विशेष कार्यक्रम मानला. विश्वस्त, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी निमित्तानिमित्ताने झाडे लावत गेले. सुमारे सहाशे वृक्ष कमीजास्त वयाचे तयार झाले आहेत. महेशने त्याला पर्यावरणाचा अर्थ दिला. त्याभोवती परंपरेचे कोंदण रचले. महेशने चक्क सत्यवृक्षाची पूजा शाळेत बांधली! त्यासाठी निमित्त केले गेल्या वर्षी लावलेल्या झाडांच्या पहिल्या वाढदिवसाचे. सत्यवृक्षाची पूजा गुरुपौर्णिमेलाच झाली. त्यासाठी महेशने आयुर्वेद ग्रंथातून वृक्षमहतीचे श्लोक जमा केले. भालचंद्र दांडेकर या उच्चशिक्षित पुरोहित मित्राची मदत घेतली. प्रत्यक्ष पूजेमध्ये चौरंगावर दुर्मीळ रुद्राक्ष वंशाचे रोपटे ठेवले. खरे व शाळेचे मुख्याध्यापक दादाराव चव्हाण यांनी पूजा सांगितली. पूजेतील कहाणी ‘सत्यनारायणा’च्या धर्तीवर रचली. पण, या कथेतील पात्रे म्हणजे वृक्षसंवर्धन चळवळीतील वेगवेगळे पुरुष-स्त्रिया होत्या - अमृतादेवी बिश्नोई, चिपको बहाद्दर, जंगलवीर जादव पायेंग, बीजमाता राहीबाई वगैरे... यांच्या सत्यकथांनी सत्यवृक्ष पूजेचा भाग रंगला.
प्रसादात शिरा ठेवला, तर इंधनामुळे ऊर्जानाश होईल, तेव्हा दही-पोह्यांचा खुमासदार प्रसाद करून त्यावर चव आणि गार्निशिंग म्हणून डाळिंबाचे दाणे टाकले. पूजेची सांगता उपस्थित सर्व मंडळींनी दोनशे नवी झाडे लावून केली. आधीची झाडे जशी वाऱ्यावर डोलतात, तशी ही झाडेदेखील उंचउंच जातील, अशा विश्वासाने मंडळी पांगली.
महेश म्हणतो, आधुनिक काळात चांगल्या रूढीपरंपरा रुजणे महत्त्वाचे आहे आणि कालानुरूप ‘नवरचना’ हे ज्या शाळेचे ध्येयव्रत आहे, त्या सोनदरा गुरुकुलासारखी दुसरी जागा त्यासाठी कोणती?