मानवतेला एकत्र आणणारी चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 09:13 AM2022-06-14T09:13:30+5:302022-06-14T09:13:36+5:30

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे.

A movement that brings humanity together | मानवतेला एकत्र आणणारी चळवळ

मानवतेला एकत्र आणणारी चळवळ

Next

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे. जैवविविधता टिकवून सृष्टी जगवायची असेल तर जागतिक पातळीवर -हास होत असलेल्या मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत आपल्याला तशी संधीही मिळणार नाही. यासाठीच 'सेव्ह सॉइल' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. २७ देशांच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माती वाचवा चळवळ मानवतेला एकत्र आणत आहे.

पर्यावरणीय बदलांचे धोके आज आपल्यासमोर येत आहेत. प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचा परिणाम हा मातीच्या आरोग्यावर होतो. हे काम आपल्याला करायचे आहे. वसुंधरा ही आपलीच नव्हे तर प्रत्येक प्राणिमात्राची जननी आहे. पण मनुष्याची हुशारीच संपूर्ण सृष्टीच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. मातीचा न्हास करण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत. मात्र, एक इंच माती निर्माण करायची झाली तरी हजारो वर्षे लागतात. जागतिक पातळीवर विचार केला तर आपण आताच जमिनीवरील तब्बल १८ इंच माती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज समोर येत आहेत. मात्र, भावी पिढीसाठी हे परिणाम आणखी भयानक असतील. लोकसंख्या सतत वाढत आहे. अन्नाची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे. अन्न हे फक्त शेतीतून मिळते. मंगळ आणि चंद्रावरून अन्न येणार नाही. त्यासाठी पृथ्वीवरील माती वाचलीच पाहिजे. त्यामुळे माती संवर्धनाशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

माती संवर्धन म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मातीमध्ये कमीत कमी ३ टक्के सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. यासाठी प्रत्येक माणसाने आपला वाटा उचलला पाहिजे. शेती, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीचा -हास होत आहे. जागतिक स्तरावर ५२ टक्के शेतजमीन आधीच निकृष्ट आहे. जर मातीचा -हास असाच सुरू राहिला तर जीवनाचाच अंत होईल. आज संपूर्ण जगातील शेतीसमोरील संकट म्हणजे रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे शेतीवरील खर्च वाढत आहे. मात्र, शेतातील माती समृद्ध झाली तर रसायने आणि खतांचा वापर कमी होईल. जगातील आठ अब्ज लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर झालाच पाहिजे, असा युक्तिवाद काही जण करतात. मी स्पष्ट करू इच्छितो की माझा रासायनिक खतांना पूर्ण विरोध आहे असे नाही; पण तुमची जमीन समृद्ध असेल, त्यातील सेंद्रिय सामग्री १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढवता आली तर रासायनिक खतांशिवाय अन्न उत्पादन वाढविणेही शक्य होईल. आम्ही प्रयोगाने हे सिद्धही केले आहे.

जगातील २६ देशांमध्ये प्रवास करून आता भारतात ही मोहीम पोहोचली आहे. या प्रवासात प्रत्येकजण माझ्याबरोबर चालत आहे. याचे कारण माती ही मानवी जीवनाचा स्त्रोत आहे. माती संवर्धनामध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. माती वाचविण्यासाठी विशेष धोरण आखले पाहिजे. त्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवायला हवे. जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे माझे प्रत्येकाला आवाहन आहे की, माती संवर्धनासाठीचा आवाज बुलंद करा. जगातील प्रत्येक सरकार मातीच्या संवर्धनासाठी धोरण करत नाही तोपर्यंत यावर बोलत राहा. तुमच्याकडे ही शक्ती आहे. कारण लोकशक्ती हीच खरी शक्ती असते.

- सद्गुरु
संस्थापक, ईशा फाऊंडेशन

Web Title: A movement that brings humanity together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी