जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 07:28 IST2025-06-01T07:26:57+5:302025-06-01T07:28:00+5:30

कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचे समुपदेशन

Zilla Parishad to provide Judo, Karate, Yoga training to girls and female teachers in schools | जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण

जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जिल्हा परिषदांच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना, तसेच महिला शिक्षकांना ज्युडो कराटे, योग आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

महिला व मुलींवर होणारे अन्याय, त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे, यासाठी इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या व महाविद्यालयांतील मुलींना, तसेच इच्छुक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे आदींचे प्रशिक्षण ९० दिवस किंवा १२० तास दिले जाईल. कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ वा अन्य कारणांनी मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांचे सामाजिक, मानसशास्रीय आणि कायदेशीर समुपदेशन केले जाईल.

वसतिगृहे नसलेल्या ठिकाणी भाडेतत्वावर इमारत, घर, फ्लॅट घेऊन गरजू मुलींच्या निवासाची मोफत व्यवस्था करण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला आहे. जेवणाचा खर्च मुलींना करावा लागेल. ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित करण्याची स्थायी व्यवस्था उभी केली जाणार आहे.

दुर्धर आजारी मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य

  • हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींच्या हृदय शस्रक्रिया, अस्थिव्यंगावरील शस्रक्रिया, सेरेब्रलपाल्सी, कर्करोग, किडणीतील दोष अशा गंभीर शस्रक्रियांसाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. प्राथमिक तपासणीसाठी १५ हजार व शस्रक्रियेसाठी ३५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल. 
  • घटस्फोटित, परितक्त्या व गरजू महिलांना घरकुलासाठी ५० हजार, अनाथ मुलींना शालेय साहित्य, इतर खर्चासाठी २ हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य. अतितीव्र कुपोषित बालके नसलेल्या ग्राम पंचायतीला ५० हजाराचे बक्षीस दिले जाईल.


ग्रामीण भागातील मुली, महिलांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
-जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

Web Title: Zilla Parishad to provide Judo, Karate, Yoga training to girls and female teachers in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.