-बाळकृष्ण परबगेल्या अनेक वर्षांपासून राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा संघर्षामुळे चर्चेत राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यावेळी नारायण राणे यांच्या पुढाकाराने झालेल्या भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. सुमारे नऊ वर्षांनी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राणेंच्या महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी मिळून जिल्हा परिषदेच्या ५० पैकी ४१ जागा जिंकल्या. तर पंचायत समितीच्याही ८५-८६ च्या आसपास जागा जिंकत जिल्ह्यातील आठही पंचायत समित्या ताब्यात घेतल्या. आधी लोकसभा, मग विधानसभा आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत यश मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात राणे कुटुंबीयांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिलं. मात्र एकीकडे या निवडणुकीत राणेंच्या महायुतीच्या विजयाचा अश्वमेध सुसाट सुटला असताना त्याला थोपवण्याचं काम सावंतवाडी-वेंगुर्ला भागात अनेक अपक्ष उमेदवारांनी केलं. भाजपामधीलच बंडखोर असलेल्या अपक्षांनी अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचं गणित बिघडवलं. एवढंच नाही तर, महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाचा धक्का देत विजयही मिळवले. त्यामुळे या निकालांनंतर महायुतीच्या यशासोबत या महायुतीला आव्हान देणारे अपक्ष आणि त्यांच्यामागील अदृश्य हातांचीही तेवढीच चर्चा होत आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गात भाजपा आणि शिंदेसेना आमने-सामने आलेली दिसली होती. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे या बंधूंमध्येही संघर्ष उफाळलेला दिसला होता. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत सिंधुदुर्गात भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती घडवून आणली होती. तसेच तिचे जागावाटपही जाहीर करून टाकले होते. पण या महायुतीबाबत भाजपातील एका गटामध्ये नाराजी असल्याचं चित्र दिसत होतं. त्यातूनच महायुतीमधील जागावाटपामुळे संधी हुकलेले अनेक स्थानिक कार्यकर्ते बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात या बंडखोरांचं प्रमाण लक्षणीय होतं. तसेच या बंडखोरांना काही अदृश्य हातांची साथ मिळत असल्याचंही बोललं जात होतं.
या निवडणुकीत ठळकपणे दिसलेली बाब म्हणजे जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण आणि कुडाळ या पाच आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यांमध्ये महायुतीनं निर्विवाद वर्चस्व राखलं. मात्र खरा खेळ झाला तो सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात. येथे बंडखोर अपक्ष उमेदवारांनी अनेक गट आणि गणांमध्ये महायुतीची गणितं बिघडवून टाकली. सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात अनेक ठिकाणी अपक्ष विरुद्ध महायुती अशीच मुख्य लढत रंगली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पुढे निकालांमध्येही या अपक्षांचा दबदबा दिसून आला. तसेच त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढत असलेल्या काही कट्टर राणे समर्थकांसह शिंदेसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला. त्यातही कोलगाव, माडखोल, इन्सुली आणि आडेली या ठिकाणी झालेले पराभव राणेंच्या जिव्हारी लागणारे आहेत. अपक्षांनी दाखवलेल्या या करिष्म्यामुळे या त्यांचेमागे कोण होतं आणि त्यांची ताकद किती आहे, याची चर्चा आहे.
बाकी या निवडणुकीतील उद्धवसेनेच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, एके काळी जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या या पक्षाची या निवडणुकीत अक्षरशः वाताहत झाली आहे. उद्धवसेनेला सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी केवळ तीन आणि पंचायत समितीच्या १०० जागांपैकी केवळ ७ जागाच जिंकता आल्या आहेत. त्यात नितेश राणेंचं वर्चस्व असलेल्या कणकवली विधानसभा क्षेत्रात उद्धवसेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही. तर वेंगुर्ला तालुक्यात जिंकलेल्या दोन जागा हीच काय ती उद्धवसेनेसाठी समाधानकारक बाब ठरलीय. त्यातल्या त्यात काही वर्षांपूर्वी राणे कुटुंबीयांसमोर मोठं आव्हान उभं करणाऱ्या वैभव नाईक यांनी कुडाळमध्ये महायुती आणि राणेंना झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तरीही उद्धवसेनेची व्होट बँक बऱ्यापैकी कायम ठेवण्यात आलेलं यश हीच त्यांच्यासाठी समाधानकारक बाब म्हणावी लागेल.
खरं तर, नारायण राणे भाजपात दाखल झाल्यापासून जिल्ह्यातील भाजपात त्यांचा एकछत्री अंमल सुरू झाला होता. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात राणे कुटुंबीयांची बऱ्यापैकी पकडही निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत अदृश्य हातांनी अपक्षांच्या माध्यमातून राणे आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची केलेली पाडापाडी पाहता आता राणेंसमोर भाजपामधूनच नवं आव्हान उभं राहिलं आहे, असं दिसत आहे. त्यामुळेच परवा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या विजयाचा आनंद व्यक्त करतानाच अपक्षांनी दिलेलं आव्हान आणि त्यांना मदत करणाऱ्या अदृश्य हातांची दखल घ्यावी लागली होती. आता या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी जे काही घडलं त्याचे पडसाद यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून ते २०२९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्येही उमटू शकतात. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपावरील वर्चस्वासाठी राणे आणि पक्षांतर्गत अदृश्य हातांमध्ये सुरू झालेल्या या संघर्षामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुढे काय घडणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Web Summary : Rane's Mahayuti secured a significant victory in Sindhudurg's Zilla Parishad elections. However, independent candidates, fueled by internal dissent, challenged the Mahayuti, especially in Sawantwadi-Vengurla. This raises questions about internal BJP rivalries and their future impact on local politics.
Web Summary : सिंधुदुर्ग जिला परिषद चुनाव में राणे की महायुति विजयी हुई। बागी निर्दलीय उम्मीदवारों ने महायुति को चुनौती दी, खासकर सावंतवाड़ी-वेंगुर्ला में। इससे भाजपा के भीतर की प्रतिद्वंद्विता और स्थानीय राजनीति पर इसके भविष्य के प्रभाव के बारे में सवाल उठते हैं।