You take credit, but stand up in court; Ashok Chavan's appeal to Central Government about Maratha reservation issue | भले श्रेय तुम्ही घ्या, पण कोर्टात भूमिका मांडा; अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारला आवाहन

भले श्रेय तुम्ही घ्या, पण कोर्टात भूमिका मांडा; अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारला आवाहन

मुंबई :मराठा आरक्षण हा श्रेय घेण्याचा विषय नाही. केंद्र आणि राज्य सरकारने भूमिका मांडण्यात यात फरक आहे. सर्वोच्च न्यायालयाने ॲटर्नी जनरल यांना भूमिका मांडायला सांगितले आहे. त्यामुळे केंद्राने यावर विस्तृत भूमिका घेण्याची गरज आहे. भलेही श्रेय तुम्ही घ्या, पण सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका घ्या, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पाच न्यायमूर्तींपुढे २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. ही संपूर्ण मुलाखत लोकमत यूट्यूब आणि लोकमत फेसबुकवर आपल्याला पाहता येईल. मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीराजे आणि विनायक मेटे यांच्या आरक्षणाबद्दलच्या भूमिकेवरही चव्हाण यांनी आपली ठाम मते मांडली आहेत. 

मागच्या सरकारचे कोणतेही वकील आम्ही बदलले नाहीत. उलट कपिल सिब्बल, अभिषेक मनू संघवी असे आणखी मातब्बर वकील त्यात आले आहेत. देशातील सर्वोच्च वकिलांची त्यात भरच झाली आहे. मात्र या विषयावर काहीतरी चुकीचे बोलून दुधात मिठाचा खडा टाकू नका. वकिलांना यात राजकारण करायचे नाही, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्यानंतर त्यांच्यासमोर जे बोलले जाते त्याच्या नेमकी वेगळी  विधाने बाहेर केली जातात. हे थांबले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

ज्यांना ईडब्ल्यूएसचा पर्याय हवा आहे, त्यांनी तो घ्यावा, ज्यांना तो पर्याय नको असेल त्यांनी तो घेऊ नये आणि ज्यांना निर्णय येईपर्यंत थांबावे असे वाटत असेल तर तोदेखील पर्याय खुला आहे. आम्ही पहिली स्थगिती आली त्याचवेळी अनेक निर्णय घेतले होते. एसईबीसीला स्थगिती आल्यामुळे ईडब्ल्यूएस हा पर्याय उपलब्ध होता, म्हणून त्यावर निर्णय घेतला. पण काहींनी तो निर्णय नको अशी भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात काही विद्यार्थी न्यायालयात गेले, पर्याय असताना आम्हाला घेऊ दिला जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. शेवटी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही सर्व पर्याय खुले करून दिले आहेत, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यावर जी भूमिका मांडली होती, त्याच्या नेमकी उलट भूमिका ते घेत आहेत. हा विषय राजकारण करण्याचा नाही. जी भावना त्यांची होती तीच आमची आहे. फडणवीस यांनी आता राजकारणासाठी वेगळी भूमिका घेऊ नये, असेही चव्हाण म्हणाले.

छत्रपती संभाजी राजेंच्या चार पत्रांना पंतप्रधानांकडून उत्तर नाही..!
भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा पत्र पाठवल्याचे मला सांगितले. मात्र त्यांनाच अजून पंतप्रधानांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. भाजप खासदारांची ही शोकांतिका असेल, तर यावर मी काय बोलणार? मात्र या संपूर्ण प्रकरणात संभाजीराजे यांनी अतिशय सामंजस्याने भूमिका मांडली आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी कुठेही राजकीय वाद होऊ दिलेला नाही. समाजाला दिशा मिळावी या उदात्त हेतूने ते काम करत आहेत व त्यांचे काम सकारात्मक आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You take credit, but stand up in court; Ashok Chavan's appeal to Central Government about Maratha reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.