तुम्ही माझ्या संघर्षाचे… माझ्या आयुष्याचे साक्षीदार…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:30 IST2026-01-31T10:29:45+5:302026-01-31T10:30:39+5:30
Ajit Pawar : प्रिय साहेब, सुनेत्रा, सुप्रिया, माझे कुटुंबीय... अन् माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणारे सर्व महाराष्ट्रजन... जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनो...

तुम्ही माझ्या संघर्षाचे… माझ्या आयुष्याचे साक्षीदार…
तुम्ही माझ्या संघर्षाचे… माझ्या आयुष्याचे साक्षीदार…
आज मी जे लिहितो आहे… ते फक्त पत्र नाही… हे माझं आयुष्य आहे... हे माझं मन आहे.
हे ते सगळं आहे जे मी आयुष्यभर मनात ठेवलं… पण वेळ, परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यामुळे कधी बोलू शकलो नाही. लिहू शकलो नाही...
आज मन मोकळं करतोय...
आज मी नेता नाही. पदावरचा माणूस नाही. आज मी फक्त तुमच्यातला एक माणूस आहे. सामान्य माणूस.
आयुष्य मागे वळून पाहताना… मला मोठ्या सभा आठवत नाहीत. मला मोठे निर्णय आठवत नाहीत. मला पद आठवत नाही.
मला आठवतं.. गावातला धुळीचा रस्ता. पहाटे उठून कामाला जाणारा शेतकरी. आईच्या हातचा साधा जेवणाचा घास. लोकांच्या डोळ्यात दिसणारी अपेक्षा. अन् घरी परतल्यावर मिळणारी शांत नजर.
लोकांना वाटतं राजकारण म्हणजे सत्ता. पण मला वाटत होतं राजकारण म्हणजे जबाबदारी. लोकांच्या आयुष्याशी जोडलेली जबाबदारी. माझ्या महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी.
या सगळ्याबद्दल मनात साठवलेलं.. जपलेलं.. कागदावर उतरवतोय...
साहेब…
येतो मी.. पण जाता-जाता तुमच्या या लाडक्या पुतण्याला काही सांगायचंय...
तुमच्याबद्दल लिहायला बसलो की, मनात खूप भावना एकत्र येतात. गलबलून येतं. कारण तुमचं आणि माझं नातं फक्त राजकीय नव्हतं… ते मार्गदर्शनाचं होतं… ते शिकवणुकीचं होतं… ते विश्वासाचं होतं… आणि अनेक वेळा ते वडीलधाऱ्यांच्या सावलीसारखं होतं.
तुमच्याशी अनेकदा अनेक विषयांवर बोललो. चर्चा केली. वादही घातले असतील. पण ते तुमच्या-माझ्यासाठी नव्हतं... जनतेसाठी.. महाराष्ट्रासाठी... विकासासाठी होतं.
तुमच्याकडून मी शिकलो... निर्णय घ्यायला. निर्णयाची जबाबदारी घ्यायला. संकटात शांत राहायला. लोकांच्या रागाला घाबरायचं नाही… पण लोकांच्या वेदना समजून घ्यायच्या.
तुम्ही मला एक गोष्ट शिकवली... राजकारण म्हणजे फक्त सत्ता मिळवणं नाही… राजकारण म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करणं. तो पेलणं.
मी अनेक वेळा तुमच्याकडे बघून शिकलो… संकट कितीही मोठं असो… वाद कितीही मोठा असो… तरी निर्णय घेताना मन शांत ठेवायचं.
तुम्ही कधी घाई केली नाही. तुम्ही कधी भावनेत वाहून निर्णय घेतले नाहीत. तुम्ही नेहमी विचार केला... या निर्णयाचा लोकांवर काय परिणाम होईल. तोच विचार मी आयुष्यभर ठेवण्याचा प्रयत्न केला.
आपल्या नात्यात भलेही अनेकदा मतभेद आले असतील… कधी विचार वेगळे असतील… पण एक गोष्ट कायम होती... आपण दोघंही महाराष्ट्रासाठी काम करत होतो. लोकांसाठी काम करत होतो. अन् मी तुमच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत होतो.
मी चुका केल्या असतील… पण मी कधी पळालो नाही. कारण तुमच्याकडून शिकलो... नेतृत्व म्हणजे चुकांमधून पळवाट काढणं नाही… तर चूक झाली तर लोकांसमोर उभं राहणं.
तुम्ही मला शिकवलं... लोकांशी जोडलेलं राहा. जमिनीवर राहा. लोकांचा विश्वास कधी तुटू देऊ नको.
माझ्यात काही चांगलं होतं… तर त्यात तुमचा वाटा मोठा आहे. तुमचं मार्गदर्शन हेच माझ्या आयुष्याचा पाया होतं.
तुमची कार्यपद्धती... माझ्यासाठी शाळा होती. अन् संयम... माझ्यासाठी प्रेरणा.
प्रिय सुनेत्रा,
तुला “प्रिय” म्हणताना आज शब्द गळ्यात अडकतात… कारण आयुष्यभर तू माझ्या शेजारी उभी राहिलीस अन् आज मी शब्दांतून तुझ्याशी बोलतो आहे. पण खरं सांगू का… हे पत्र नाही… हा माझ्या आयुष्याचा उरलेला स्पर्श आहे… माझ्या श्वासाचा शेवटचा आवाज आहे… तुझ्या मनात तो कायम घुमत राहील, हे मला जाणवतंय... माझ्या मनात साठलेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी आयुष्यभर तुला कधी सांगितल्या नाहीत.
मी तुला आयुष्यभर धन्यवाद बोललो नाही. आज बोलतो.
मी वेळ दिला नाही... तरी तू साथ दिलीस. मी थकलो... तरी तू मला उभं केलंस. मी तुटलो... तरी तू मला सांभाळलंस. माझं शांत राहणंही तू समजून घेतलंस.
मी अनेकदा घरापेक्षा काम निवडलं. मी अनेक सण चुकवले. मी अनेक क्षण गमावले. आपलं आयुष्य हे आपल्या महाराष्ट्रासाठी होतं... हे तू जाणलं... तशीच सोबत तूही दिलीस..
तू कधी म्हणाली नाहीस... “आता थांबा.”
तू फक्त म्हणायचीस... “लोकांसाठी काम करा.”
आज मला वाटतं... जर तू नसतीस… तर मी काहीच नसतो.
तू माझी फक्त पत्नी नव्हतीस. तू माझं धैर्य होतीस. तू माझी शांतता होतीस. तू माझं घर होतीस.
आज तुला सांगतो... रड… मन मोकळं कर… पण तुटू नकोस. कारण तू मजबूत असशील... तर माझं आयुष्य जिवंत राहील. आपलं कुटुंब उभं राहील... आता आभाळ कोसळलं असं वाटत असलं तरी... यापुढचं आयुष्य... कुटुंब... तू कोसळू देणार नाहीस.. याची खात्री आहे... कारण कोसळणं तुला-मला आपल्याला कधीच माहीत नव्हतं...
सुप्रिया,
तुला एक गोष्ट सांगायची राहुन गेली... आपलं नातं फक्त राजकारणाचं नव्हतं. बहीण-भावाचं पवित्र नातं होतं. विश्वासाचं होतं. कुटुंबाचं होतं. एकमेकांना समजून घेण्याचं होतं. आपण नेहमी एकमेकांशी प्रत्येक गोष्टीवर सहमत होतं होतोच असं नाही. पण आपण एकमेकांचा आदर केला. एकमेकांच्या भूमिकेला समजून घेतलं. कारण शेवटी आपल्यासाठी सर्वात मोठं काय होतं... तर महाराष्ट्र… आणि आपली जनता.
मला नेहमी वाटायचं... तू लोकांना ऐकतेस. तू लोकांशी बोलतेस.. नेता म्हणून नाही… तर आपल्या माणसासारखी. हे खूप मोठं सामर्थ्य आहे.
आपण अनेक वेळा एकत्र लोकांमध्ये गेलो… कधी गावात… कधी कार्यकर्त्यांमध्ये… कधी संकटाच्या वेळी लोकांसोबत उभे राहिलो… त्या वेळी मला जाणवायचं... लोक तुला फक्त नेता म्हणून बघत नाहीत… ते तुला “आपली बहीण” म्हणून बघतात.
हे नातं जप. कारण राजकारण बदलतं… पण लोकांचं नातं बदलायला नको. लोकांशी जोडलेली राहा.
राजकारण जिंकण्यापेक्षा... लोकांच्या मनात जागा बनवणं महत्त्वाचं असतं, हे आपण दोघंही जगलोय... आता मी नसताना तू ते कायम ठेवशील, हा मनोमन विश्वास आहे.
कधी कठीण निर्णय घ्यावे लागतील. कधी लोक नाराज होतील. कधी टीका होईल. पण जर लोकांना खात्री असेल की... “ती आपल्यासाठी निर्णय घेते” तर ते तुझ्यासोबत उभे राहतील.
आपल्या नात्यात एक गोष्ट कायम होती... लोक आधी… बाकी सगळं नंतर. ती गोष्ट कधी बदलू देऊ नकोस.
निवडणूक जिंकली तर पद मिळतं. लोकांचं मन जिंकलं तर आयुष्यभर मान मिळतो.
तू पुढे जाशील… पण लोकांना सोबत घेऊन जा. कारण लोक सोबत असतील तर कोणताही प्रवास कठीण नसतो.
आणि वैयक्तिक एक गोष्ट... आपण दोघांनी जे नातं जपलं… ते आदराचं… विश्वासाचं… आणि महाराष्ट्रासाठी असलेल्या बांधिलकीचं होतं. तो वारसा पुढे ने. तोच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल.
पार्थ, जय...
तुटू नका.. ही वेळ खचण्याची नाही... हिमतीनं उभं राहण्याची आहे. केवळ तुमची आई सुनेत्रा अन् कुटुंबच नव्हे तर अवघा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुमच्याकडं बघून लोकांना उमेद राहिली पाहिजे... त्यामुळे तुम्ही नव्या उमेदीनं, ताकदीनं अन् हिमतीनं उभं राहिलं पाहिजे... राहाल ना?
माझ्या कुटुंबीयांनो, आप्तस्वकीयांनो अन् जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनो,
आपण संघर्ष करून पुढे आलो. आपण मेहनतीतून उभे राहिलो. आपण लोकांच्या विश्वासातून जिवंत राहिलो. आपण सत्ता कमावली नाही. आपण विश्वास कमावला. जात-धर्माच्या राजकारणाला थारा न देता आपण समाजाचं हित पाहिलं. तुम्हीही तेच करावं, एवढी अपेक्षा आहे.
आता तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की, हा विश्वास जपा. पैसा असेल-नसेल. पद असेलही नसेलही. कधीकाळी सत्ता येईल-जाईल. पण लोकांचा विश्वास गेला तर सगळं संपेल. म्हणून म्हणतो, बाबांनो विश्वास तुटू देऊ नका... तीच आपली खरी किंमत आहे.. तोच आपला कणा आहे.
ज्यांच्यासाठी आयुष्यभर झटलो, त्या माझ्या महाराष्ट्रजनांसाठीही काही मनात आहे. ते लपवून चालणार नाही.
माझ्या तरुण-तरुणींनो… शेतकऱ्यांनो... माता-भगिनींनो...
मोठी स्वप्नं बघा. अपयशाला घाबरू नका. मेहनत सोडू नका. माझ्या शेतकरी बांधवांनो… गड्यांनो तुमचा घाम महाराष्ट्राचा पाया आहे. तुमचा सन्मान राज्याचा मान आहे.
माझ्या माता-भगिनींनो… तुमच्याशिवाय जसं कुटुंब अपूर्ण असतं, तसंच तुमच्याशिवाय समाज पूर्ण नाही. तुमचा सन्मान हीच समाजाची, महाराष्ट्राची प्रगती आहे. मोठं व्हा... माझ्या महाराष्ट्राला आणखी मोठं करा.
येतो मी...
श्वास थांबलाय... पण अखेरचं काही....
ज्या दिवशी माणूस पद सोडतो… त्या दिवशी त्याला कळतं... त्याने काय कमावलं.
मी सत्ता कमावली का? माहीत नाही. पण मी लोकांचं प्रेम कमावलं हे मला कळलं.
माझ्या जाण्यानं महाराष्ट्र हळहळला. बारामतीत माझ्यासाठी जमलेला जनसागर पाहून... माझेही डोळे भरून आले... हीच माझी कमाई...
जर कधी माझी आठवण आली… तर रडू नका. अभिमान बाळगा.
कारण माझं आयुष्य लोकांसाठी होतं. महाराष्ट्रासाठी होतं. तुमच्यासाठी होतं.
एकत्र राहा. पुढे चालत राहा. मतभेद असू देत… पण मनभेद नकोत.
जर पुन्हा जन्म मिळाला… तर मी पुन्हा लोकांसाठी काम करेन.
पुन्हा महाराष्ट्रासाठी उभा राहीन.
मी जात नाही…
मी फक्त दिसणं थांबवतो आहे.
मी असेन...
तुमच्या आठवणीत…
तुमच्या जिद्दीमध्ये…
तुमच्या संघर्षात…
महाराष्ट्राच्या प्रत्येक पुढच्या पावलात…
कारण माझा महाराष्ट्र…पुढे चालत राहिला पाहिजे. प्रगतिपथावर राहिला पाहिजे...
कराल ना तुम्ही सगळे एवढं... माझ्यासाठी...
तुमचाच…
शेवटच्या श्वासापर्यंत… मनाने कायम तुमच्यात राहणारा… तुमचाच दादा!
(उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मनात काय भावना असतील, अशा भूमिकेतून लिहिलेले हे पत्र काल्पनिक आहे.)