लिहून ठेवा... कलेक्टरच होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:07 IST2025-12-28T13:07:25+5:302025-12-28T13:07:25+5:30
ही सर्व मुले शिकताहेत कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या दुर्गम चाळणवाडीतील (ता. शाहूवाडी) जिल्हा परिषदेच्या अवघ्या नऊ पटसंख्येच्या कृतिशील प्राथमिक शाळेत.

लिहून ठेवा... कलेक्टरच होणार!
भरत बुटाले, वरिष्ठ उपसंपादक, काेल्हापूर -
तुमच्या डायरीत लिहून ठेवा, मी वयाच्या २१व्या वर्षी कलेक्टर होणारच..’ इतक्या आत्मविश्वासानं सांगणारा इयत्ता चौथीतला तन्मय कृष्णा पवार बहुगुणांची खाणच आहे. दुसरी, तिसरीच्या सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण. तिसरीत असतानाच चौथीचा अभ्यासक्रम पूर्ण. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ‘प्रज्ञाशोध’च्या दहा विविध परीक्षांत पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण. वरच्या वर्गातील गणिते सोडवितो. जपानी भाषा पूर्णतः अवगत. त्या भाषेत स्वतःच्या संपूर्ण ओळखीसह जपानी प्रेरणादायी गीते, तिन्ही काळातील वाक्ये बनवून त्याच भाषेत लिलया सांगतो. मातृभाषेसह इंग्रजीवरही त्याचे प्रभुत्व आहे. अचाट बुद्धिमत्ता असलेल्या तन्मयचा दिवस सुरू होतो पहाटे
चार वाजता.
तन्मयसारखीच अन्य मुले अन् मुलीही या सर्व गोष्टींत माहीर आहेत. पहिलीतल्या वेद ढोकेला व्हायचंय कॉमेडियन, सलग पाच मिनिटे धाडसाने स्टेजवर बोलणारा तिसरीतला स्वराज माळी म्हणतो, व्याख्याता अन् समुद्री जीवसृष्टीचा अभ्यास करून मरीन बायोलायजर होणार, हिमा दासला आदर्श मानणारी चौथीतल्या आराध्या जोगळेनं धावपटू व्हायचं ध्येय बाळगलंय. दहा प्रज्ञाशोध परीक्षांना बसलेला राजवीर ढोके ध्येयानं झपाटलाय. सुंदर लिखाण, सर्व विषयांत हुशार अष्टपैलू रिद्धी चांदेला कलेक्टर व्हायचंय. तृप्ती पवारला शिक्षक होऊन कलेक्टर घडवायचेत. श्लोक ढोके, आरोही ढोके व रुद्र गायकर ही तर अजब रसायनं आहेत. बालवाडीतला अजिंक्य ढोके जपानी फाडफाड बोलून अवाक् करतो.
झेडपीची शाळा, दुर्गम भागात
ही सर्व मुले शिकताहेत कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या दुर्गम चाळणवाडीतील (ता. शाहूवाडी) जिल्हा परिषदेच्या अवघ्या नऊ पटसंख्येच्या कृतिशील प्राथमिक शाळेत.
दीडशे वस्तीचं गाव. काही पालक कामाच्या निमित्ताने मुलांना घरातील ज्येष्ठांकडे सोपवून मुंबईला गेलेली, तर काही जवळपास काम करणारी.
प्राथमिक शिक्षक संदीप रावसो पाटील व पत्नी गृहिणी श्रुती हेच त्यांचे गुरू. दोघांनी विद्यार्थी हेच सर्वस्व मानलंय. ते मूळचे गारगोटी तालुक्यातील नाधवडेचे. बी.ए., डी.एड.नंतर संदीप यांना शिक्षण सेवक म्हणून पहिली नियुक्ती मिळाली आताच्या पालघर जिल्ह्यातील आंबेरे या आदिवासी पाड्यात.
२००५ला शिरोळ तालुक्यातील दानोळी कुमार विद्यामंदिरात आले. तिथेही चुणूक दाखवत राज्यातील जिल्हा परिषदेची पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात मोलाचा वाटा उचलला.
बारा महिने अखंड ज्ञानगंगा
चिमुकली आता अपवाद सोडल्यास अगदी दिवाळी व मेमध्येसुद्धा एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. ‘वर्षभर शाळा...’ संकल्पना त्यांनीच बनवलीय. पाटील दाम्पत्याने प्रथम मुलांच्या क्षमता ओळखून त्यांच्यात ज्ञानाची भूक वाढविली. पाठबळ दिलं. शालेय, स्पर्धा परीक्षेसाठी अवांतर पुस्तके उपलब्ध केली. शिकण्यासाठी वेगळी भाषा म्हणून जपानी भाषा निवडली आणि त्याच भाषेचं मटेरिअल आणलं. पुण्यातील ‘ॲपल’मधील अकाउंटंट मालविका वैद्य जपानी भाषा शिकण्याच्या क्लृप्त्या ऑनलाइन पाठवितात.
अलिखित वेळापत्रक : मुलांचे तास, जेवण, खेळ आदी गोष्टींचे अलिखित वेळापत्रक आहे. त्यासाठी घंटा वाजत नाही. मुले स्वयंशिस्तीप्रिय आहेत.
आरोग्याची काळजी : प्रत्येक विद्यार्थी सकाळी आवळा चूर्ण व मध घेतो. जेवणात पौष्टिक घटक, रानभाज्या असतात.
पदरमोड अन् मदतही : मुलांना सुदृढ ठेवण्यासाठी पाटील दाम्पत्य बहुतांश वेळेला स्वतःकडचे पैसे खर्च करतात. त्यांना विविध स्तरांतून मदतही मिळते.
निरपेक्ष भावनेच्या श्रुती : गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणाऱ्या श्रुती पाटील स्वखुशीने या मुलांच्या गुरू झाल्या आहेत. संस्कारवृद्धी करणारी, विविध पदार्थ करून घालणारी त्यांची ती माताच आहे.
यशोगाथा दिल्लीत होणार सादर : शासनाचे प्रतिनिधी म्हणून ‘डाएट’च्या अधिव्याख्याता डॉ. अंजिली रसाळ यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. या शाळेची यशोगाथा दिल्लीत सादर होणार आहे.