Maharashtra Kesari Wrestling Tournament: राज्यातील पैलवान सरकारला चांदीच्या ६० गदा परत करणार; मुंबईत गुरुवारी साकडे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:36 IST2026-03-11T17:33:17+5:302026-03-11T17:36:01+5:30
आझाद मैदानावर एल्गार

Maharashtra Kesari Wrestling Tournament: राज्यातील पैलवान सरकारला चांदीच्या ६० गदा परत करणार; मुंबईत गुरुवारी साकडे आंदोलन
विटा (जि.सांगली) : प्रत्येकवर्षी महाराष्ट्रात एकच मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील कुस्ती क्षेत्रातील सर्व मल्ल आक्रमक झाले आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील पैलवान गुरुवारी (दि. १२) मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय साकडं आंदोलन करणार आहेत. त्यादिवशी सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी मल्ल आपल्या ६० चांदीच्या गदा सरकारकडे जमा करणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.
पै. चंद्रहार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे ही प्रथा बंद करून मानाची एकच स्पर्धा व्हावी, यासाठी मी गेल्यावर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागील ६० वर्षांच्या परंपरेनुसार राज्यात मानाची असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकच झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.
त्यानंतरही शासन दरबारी दखल न घेतल्यामुळे आणि यावर्षीही संघटनांच्या वादामुळे ४ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. ही प्रथा तातडीने बंद झाली पाहिजे. राज्यात मानाची एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी, ही मागणी घेऊन आम्ही कुस्ती क्षेत्रातील सर्व पैलवान सरकार दरबारी जात आहोत.
१२ मार्च राेजी आझाद मैदानावर एल्गार
बुधवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता कराड येथे स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान आणि कुस्ती शौकीन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत. गुरुवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय साकडं आंदोलन करून उपोषण करणार आहोत. यावेळी सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी आपल्या ६० चांदीच्या गदा सरकारला परत करणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी सांगितले.