अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपसोबत गेले असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 06:45 IST2026-02-02T06:43:53+5:302026-02-02T06:45:14+5:30
मुंबई: राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठका झाल्या होत्या. त्यात नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता किंवा कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली? याबाबत संशयाचे दाट धुके तयार झाले आहे.

अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपसोबत गेले असते?
यदु जोशी,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठका झाल्या होत्या. त्यात नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता किंवा कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली? याबाबत संशयाचे दाट धुके तयार झाले आहे. विलीनीकरणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजपसोबत गेले असते की अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते, असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
बैठकांना उपस्थित ज्येष्ठ नेत्याने दावा केला की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहावे आणि भाजपच्या केंद्र व राज्य सरकारमध्ये पाठिंबा कायम ठेवावा, अशी भूमिका बैठकांमध्ये अजित पवार गटाने मांडली. मात्र एकमत होऊ शकले नव्हते.
दोन गटांच्या विलीनीकरणाबाबतची चर्चाही शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी विनंती केल्यानंतर सुरू झाली. सुरुवातीला अशी चर्चा करण्याबाबत अजित पवार हे राजी नव्हते, पण नंतर कुटुंबात आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी त्यासाठी होकार दिला. मात्र या विलीनीकरणाबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फारशी अनुकूलता दर्शविली नव्हती. शरद पवार यांना सोबत घेण्याबाबत भाजपचे नेतृत्व इच्छुक नव्हते. तरीही अजित पवार यांच्या पक्षाने विलीनीकरणाबाबतची चर्चा सुरू ठेवली. कारण, उद्या शरद पवार गट भाजपसोबत येण्यास राजी झाला तर भाजपच्या नेतृत्वाला तसे सांगून त्यांचेही मन वळविता येईल, असा अजित पवार गटाचा होरा होता असे आता म्हटले जात आहे.
शरद पवार गटातील २ एका बड्या नेत्याला दूर ठेवून मगच चर्चा करावी आणि दोन पक्ष एकत्र आले तरी त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद देऊ नये, असा अजित पवार गटाचा सुरुवातीला आग्रह होता, पण नंतर चर्चेत त्या नेत्याला सहभागी करून घेण्यास ते राजी झाले, असे सूत्रांनी सांगितले. शरद पवार गटातील एक-दोन मोठे नेते असे आहेत, की ज्यांचा विलीनीकरणाला पाठिंबा होता, पण विलीनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध होता. मात्र, उद्या तशी वेळ आलीच तर या नेत्यांना त्यांचा वेगळा निर्णय घेऊ द्यावा, त्यांची चिंता करू नये, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले होते, अशी खात्रीलायक माहिती आहे.
विलीनीकरणासाठी अनेक बैठका झाल्या असे शरद पवार गटाचे अनेक नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर लगेच सांगू लागले आहेत. १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाचा मुहूर्तही ठरला होता, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, केंद्र व राज्यात भाजपला एकत्रित राष्ट्रवादी पाठिंबा देणार होती का, याबाबत या बैठकांमध्ये काय ठरले होते, यावर शरद पवार गटातील एकाही नेत्याने भाष्य केलेले नाही किंवा विलीनीकरणानंतर अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून काम करेल असे ठरले होते का, हेही ते स्पष्ट करत नसल्याने संदिग्धता कायम आहे. सोबतच विलीनीकरणाबाबत अजित पवार गटानेही मौन बाळगले आहे.
दोन्ही बाजूंनी अजूनही अस्पष्टता
विलीनीकरणाची चर्चा झाली होती. जवळपास ठरले होते, तर मग अजित पवार विलीनीकरणानंतर सत्तेतून बाहेर पडले असते की शरद पवार हे भाजपसोबत त्यांच्यासह गेले असते, याबाबतची स्पष्टता दोन्ही बाजूंनी अद्याप दिलेली नाही.
अजित पवार गटाचे दुसरे नेते कुठेत ?
विलीनीकरणाच्या संदर्भातील चर्चेचा जो कथित व्हिडीओ फिरवला जात आहे त्यात फक्त शरद पवार गटाचे नेते दिसतात, अजित पवार यांच्याशिवाय त्यांच्या गटातील कोणीही का नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.