जागतिक व्याघ्र दिवस विशेष: ‘सह्याद्री-कोकण’च्या पट्ट्यात ३२ वाघांचा वावर, व्याघ्र भ्रमणमार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:08 IST2025-07-29T16:07:17+5:302025-07-29T16:08:17+5:30
वाघांच्या संरक्षणाबाबत कृती आराखडा गरजेचा

संग्रहित छाया
कोल्हापूर : राज्यात असंरक्षित वनांमध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पाबाहेर अधिवास करणाऱ्या वाघांच्या नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारचा कृती आराखडा वनविभागाने तयार केलेला नाही. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या व्याघ्र भ्रमणमार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव आहे.
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाइल्डलाइफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट’ने (डब्लूसीटी) कोल्हापूरवनविभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेल्या अहवालात प्रसिद्ध केली आहे.
राज्य सरकार राज्यातील वाढलेल्या वाघांच्या संख्येबाबत स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तरी व्याघ्र नियोजनामधील काही बाबींकडे यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात जन्मलेला निमवयस्क नर वाघ हा बऱ्याचदा हद्दीचा शोधात लांबवर प्रवास करतो. या प्रवासात बऱ्याचदा तो असंरक्षित वनांमधून प्रवास करत निश्चित ठिकाणी जात असतो. अशाप्रकारे वाघ जेव्हा भ्रमण मार्गावर असतो, त्यावेळी त्याचे नियोजन कसे करावे, यासंदर्भातदेखील प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) उपलब्ध नाही.
‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी या नव्या रस्त्यावर कोल्हापूरमधील आंबा येथे कोणत्याही प्रकारचे अंडरपास किंवा ओव्हरपास बांधण्यात आलेले नाहीत. हाच रस्ता ओलांडून राधानगरीमधील ‘टी-१’ आणि ‘टी-२’ हे दोन नर वाघ चांदोली अभयारण्यात गेले आहेत. शिकाऱ्यांच्या बाबतही वनविभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे.
मृत्यूमागील कारणे काय?
- राज्यातील वाघांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी वनक्षेत्रामध्ये घट होत आहे.
- असंरक्षित क्षेत्रामध्ये वाढणाऱ्या वाघांच्या संख्येबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.
- व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव.
- शिकाऱ्यांचा मागमूस काढण्यासाठी आवश्यक असलेली अपुरी यंत्रणा. व्याघ्र भ्रमणमार्गामधील क्षेत्रांच्या संरक्षणामध्ये असलेले अपुरे नियोजन.
व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या प्रस्तावित रस्ते प्रकल्पात वन्यजीवांच्या सुकर भ्रमणांसाठी उपाययोजना राबवण्यामध्येही सरकार थंडावलेले दिसते. - गिरीश पंजाबी, वन्यजीव संशोधक, डब्ल्यूसीटी