World Food Day : त्यांचं पोट भरलं की 'तिचं' मन भरतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 22:11 IST2018-10-15T21:57:46+5:302018-10-15T22:11:48+5:30
तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास.

World Food Day : त्यांचं पोट भरलं की 'तिचं' मन भरतं
पुणे : ती खरं तर लहानग्या 'स्वरूप'ची आई. चारचौघींप्रमाणे आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्न बघणारी. पण नियतीच्या मनातलं कोणीही ओळखू शकत नाही. तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास.
चिंचवड येथे राहणाऱ्या विद्या जितेंद्र जोशी यांची ही कहाणी. सध्या त्या चिंचवड येथे स्वतःचा व्यवसाय करतात.एका दुःखद क्षणी त्यांचा मुलगा स्वरूपचे निधन झाले. त्यातून त्या हळूहळू सावरल्या आणि स्वराली, स्वरदाप्रमाणे अनेकांच्या आई झाल्या. मुलाच्या आजारपणामुळे त्यांना अनेकदा महिनोंमहिने रुग्णालयात मुक्काम करावा लागला.अगदी तो लहान असल्यापासून सुमारे पाच ते सहा वर्ष रुग्णालय त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले होते. त्याच्या जाण्यानंतर त्यांनी रुग्णांसाठी काम करण्याचा निश्चय केला.
सध्या त्या चिंचवड परिसरातील रुग्णांना कोणतेही शुल्क न आकारता जेवणाचे डबे देतात. फक्त रुग्णचं नाही तर त्याच्यासोबत राहून शारीरिक आणि मानसिकदृष्टया थकून जाणाऱ्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय करायलाही त्या विसरत नाहीत. आजपर्यंत अशा असंख्य आणि अनोळखी रुग्णांसाठी त्यांनी अन्नपूर्णा बनून काम केले आहे. मुख्य म्हणजे रुग्णांसाठी आपण काहीतरी वेगळे करत आहोत, त्यांच्यावर उपकार करत आहोत असे भासू नये म्हणून त्या रुग्णांशी मुद्दाम संवाद साधत नाहीत की ओळखही करून घेत नाहीत. त्यांच्या या सेवेची आवड बघून काही डॉक्टर किंवा नर्स त्यांना स्वतःहून गरजू रुग्णांची माहिती कळवतात आणि त्या डबे देण्यास सुरुवात करतात.
याबाबत त्या म्हणाल्या की, ' बऱ्याचदा रुग्णालय परिसरात कमी तिखट, तेलकट आणि स्वच्छ वातावरणात बनवलेले जेवण मिळतेच असं नाही. मुलगा आजारी असताना जो त्रास आम्हाला झाला, तो इतरांना होऊ नये या भावनेतून मी डबे देते. आता तर माझ्या लहान मुलीसुद्धा एखादे रुग्णालय दिसल्यावर 'आई, कोणी रुग्ण आहे का, चल बघूया' असं म्हणतात. ज्याला गमवायचे होते तो त्या मुलाला त्यांनी गमावले आहेच पण त्यातून बाहेर पडून इतरांच्या आयुष्यात अन्नपूर्णा बनून निरपेक्ष भावनेने जाणाऱ्या विद्या यांचे काम दखल घ्यावे असेच आहे.
तो प्रसंग मनावर कोरलेला
विद्या यांचा मुलगा फक्त आई दूध पिण्याइतका लहान असताना त्यांना एकदा रुग्णालयाजवळ खाण्यायोग्य जेवण मिळत नव्हते. त्याचे पती बाहेर जेवण शोधत असताना मुलाने मात्र भुकेने रडायला सुरुवात केली. त्याच्या बाजूला असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवण झाल्यावर त्यांनी संकोचून उरलेले जेवण त्यांना देवू केले. त्यावेळी कुठलाही विचार न करता त्यांनी जेवण केले. त्या एका प्रसंगाने रूग्णासाठी जेवणाचे महत्व पटल्याचे त्या सांगतात.