शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:25 IST2025-10-07T14:25:14+5:302025-10-07T14:25:49+5:30
निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते परंतु त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे असाही निकाल देऊन टाकला होता असं सरोदे यांनी म्हटलं.

शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
मुंबई - शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे पुन्हा उद्धव ठाकरेंना द्यायचे की नाही याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. ते चिन्ह परत दिले तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर हे चिन्ह गोठवले तरी चालेल. संविधानिकदृष्ट्या चिन्हाची जी चोरी झाली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. काही जण निर्णय न झाल्यानं सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहे आणि संविधानिकदृष्ट्या योग्य आहेत असं नाही. निकालात उद्धव ठाकरेंविरोधात असला तरी चालेल पण निकाल लागला पाहिजे. निकाल देताना कोणत्या कारणांसह निकाल देणार हे समाजातील लोकांना कळलं पाहिजे. भारतीय संविधानाला धरून निकाल असला तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असेल अशी शक्यता आहे असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना असीम सरोदे म्हणाले की, धनुष्यबाण पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचे आहे. ते चोरण्यात आलेले आहे. ही चोरी महाराष्ट्राने पाहिली आहे. अंतिम सुनावणी घेतली तरी दोन्ही बाजूची तयारी आहे. पक्ष चिन्हाचे वाटप करताना कायद्याचे उल्लंघन झालंय का, शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे परंतु ते निवडणूक आयोगाला अधिकार आहेत का हे २ प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे अंतिम सुनावणी उद्या होऊ शकते. उद्याच निकाल येईल असं होणार नाही. कदाचित काय दिवस राखीव ठेवले जातील. उद्या १६ नंबरला हा खटला आहे. दुपारी १२ वाजता सुनावणी झाली तर १-२ तास सुनावणी होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह दिले ती प्रक्रिया चुकीची आणि बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते परंतु त्यांनी शिवसेनाएकनाथ शिंदेंची आहे असाही निकाल देऊन टाकला होता. हे निवडणूक आयोगाच्या अख्यारित्य नाही, त्यांचा तो अधिकार नसताना त्यांनी निर्णय घेतला. उद्याची सुनावणी २ मुद्द्यांवर होईल. दोन्ही बाजूकडून लेखी युक्तिवाद मांडण्यात आला आहे. उद्या मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावर निकालही येऊ शकतो असंही वकील असीम सरोदे यांनी म्हटलं.
दरम्यान, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.