Raj Thackeray And Uddhav Thackeray MNS Shiv Sena Alliance News:मनसेचा तीन दिवसीय मेळावा इगतपुरी येथे सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, दोन भावांच्या एकत्र येण्याविषयी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करण्याचे टाळले. शिबिरात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याविषयी आणि एकत्र येण्याविषयी काही बोलतात का, याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याचे जोरदार समर्थन करत मराठी शाळा वाचवायच्या असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा ही सेमी इंग्लिश झाली पाहिजे. तसेच मराठीच्या समर्थनार्थ व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो होतो. मुंबईत झालेला मेळावा फक्त मराठी भाषेसाठी आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी होता, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मराठीच्या मुद्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन अनेक दिवस लोटले तरी दोघांनी एकत्र येण्याबाबत कोणतीही घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. 'एकत्र आलो आहोत, एकत्र येण्यासाठी' असे जाहीरपणे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर जाहीर होऊ द्या, मग पाहू, असा पवित्रा घेतला आहे. तर, मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यांनतर युती संदर्भातील निर्णय बघू, असे सांगत राज ठाकरे यांनी या मुद्यावर मौन बाळगले. यातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत भाष्य केले.
प्रसंगी एकटे लढू, तशी तयारी आहे
इगतपुरीतील शिबिरासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकरही उपस्थित आहेत. त्यांना पत्रकारांनी उद्धवसेना व मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना, गरज पडल्यास एकटे लढू. तशी आमची तयारी आहे, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. राज्यभरातील ठाकरे गट आणि मनसैनिक यांच्या मनोमिलनाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या सावध पवित्र्यामुळे पुढे नेमके काय होणार, यावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे समजते.
दरम्यान, मनसेने आतापर्यंत एकट्याने निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे आताही वेळ आली तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू शकतो, असे विधान काही दिवसांपूर्वी बाळा नांदगावकर यांनी केले होते. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा केली. भाजपाने या संदर्भात काही खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केले असून, त्याच्या निष्कर्षाची माहिती अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिली. महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.