अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळणार की भाजपाकडेच राहणार? प्रफुल पटेलांनी बैठकीतील निर्णय सांगून टाकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:26 IST2026-02-03T16:22:36+5:302026-02-03T16:26:24+5:30
अजित पवारांच्या निधनामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे. महत्त्वाचे असलेले अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की नाही, याबद्दलची चर्चा सुरूच आहे.

अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळणार की भाजपाकडेच राहणार? प्रफुल पटेलांनी बैठकीतील निर्णय सांगून टाकला
अजित पवार यांच्यामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली. अजित पवारांकडे असलेली काही खातीही त्यांना देण्यात आली. पण, अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवले गेले आहे. त्यामुळे अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की याबद्दल स्पष्टता आलेली नाही. त्याबद्दलच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना विचारण्यात आले. त्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी आधी झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्थखात्याबद्दल भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीसांसोबत काय चर्चा झाली?
अर्थ खाते अजित पवार सांभाळत होते. ते तुमच्याकडेच राहणार आहे का? असा प्रश्न प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला होता. प्रफुल पटेल म्हणाले, "आमची मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार महाराष्ट्र सरकारचा घटक म्हणून नवीन आहेत. बाकीच्या प्रक्रिया समजण्यामध्ये त्यांना थोडा वेळ लागेल."
अजित पवारांना अडचण नव्हती, कारण...
पटेल पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काही दिवसांमध्ये बजेट मांडणार आहे. त्यांना अडचण होऊ नये. कसे असते की, अर्थसंकल्प फक्त बोलण्याचेच काम नसते. त्यावर चर्चा होते. त्याला उत्तर द्यावे लागते. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रियाही मोठी असते. अजित पवारांना दीर्घ अनुभव होता. त्यामुळे त्यांना काही अडचण नव्हती."
"सुनेत्रा वहिनींना थोडा वेळ लागेल. म्हणून ते (मुख्यमंत्री फडणवीस) म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ द्या. मी सांभाळतो. तात्पुरते अर्थ खाते मी सांभाळतो. नंतर सुनेत्रा वहिनींशी बोलून, तुमच्यासोबत बोलून शेवटी अंतिम निर्णय तुम्हाला योग्य वाटत असेल, तसा करु", अशी माहिती प्रफुल पटेल यांनी अर्थ खात्याबद्दलच्या प्रश्नावर दिली.
पुणे, बीडचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे
सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि गेल्या काही वर्षात गुन्हेगारीमुळे चर्चेत राहिलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार, याकडेही लक्ष होते. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.
विलिनीकरणाचा विषय बंद? प्रफुल पटेल काय बोलले?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर प्रफुल पटेल यांना प्रश्न विचारला गेला. ते म्हणाले की, "आज जो माझा पक्ष आहे, त्याबद्दलच मी बोलणार. काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही."
"मी इतकंच सांगू इच्छितो की, मी अजित पवारांसोबतचा पदाचा विचार करता सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो, हे तर मान्य करावं लागेल. माझी भूमिका अजित पवारांच्या सुसंगतच राहिली आहे. २०२३ मध्ये जो निर्णय केला, तेव्हा अजित पवारांसोबत राहिलो. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चालली होती. जी काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, ती आमच्या पक्षापुरतीच मर्यादित राहणार आहे. ज्या काही गोष्टी आहे, माझ्या मते त्यावर आता चर्चा करणे योग्य नाही", असे पटेल विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलले.