दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:11 IST2025-09-09T11:07:44+5:302025-09-09T11:11:05+5:30

दसरा मेळाव्यानंतर पक्षप्रवेश होतील. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आमच्याकडे जोरात तयारी सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. 

Will shock Uddhav Thackeray after Dussehra rally, except 2 MLAs, others are in touch; Eknath Shinde Sena leader Krupal Tumane claims | दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा

दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का देण्याची तयारी शिंदेसेनेने केल्याचं समोर आले आहे. ठाकरेंचे २ आमदार वगळता बाकीचे सर्व संपर्कात आहेत. सोबतच अनेक माजी नगरसेवकही पक्षात येतील असा दावा शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना कृपाल तुमाने म्हणाले की, दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही मुहूर्त काढणार आहोत. ठाकरेंचे २ आमदार सोडून बाकी सर्व आमच्या संपर्कात आहेत. जे उरले सुरले नगरसेवक आहेत, त्यातील ८० टक्के नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांचाही पक्षप्रवेश होईल. उबाठा संपलेली तुम्हाला दिसेल. दसरा मेळाव्यानंतर पक्षप्रवेश होतील. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आमच्याकडे जोरात तयारी सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच संजय राऊत रोज बोलतात, धमाका करणार, कसला धमाका करणार, उपराष्ट्रपतीच्या निवडणूक निकालातून तुम्हाला आजच एक धमाका मिळेल. संजय राऊतांच्या गोष्टी हवेत बाता मारण्यासारख्या असतात. बाकी काही नाही. जे आमदार संपर्कात आहेत, त्यांना सगळे नियमानुसार पक्षात घेऊ असं आमदार कृपाल तुमाने यांनी सांगितले आहे.

तुमचा पराभव आम्हीच केला, मागच्या दाराने विधान परिषदेत गेला

दरम्यान, कृपाल तुमाने यांचा लोकसभेला आम्ही दारूण पराभव केला, ते अशी भाषा वापरतायेत. तुमानेंना इतके महत्त्व द्यायची गरज नाही. त्यांना नैराश्य आले आहे. ज्यांचा स्वत:चा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघाला आहे, ते दुसऱ्यांचे आमदार पक्षात घेण्याची भाषा करतात. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत तो शुद्ध निष्ठावंत लोकांचा पक्ष आहे. ज्यांना जायचे होते तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, सीबीआय, ईडी यांच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांवर बोलणे म्हणजे शिवसेनेचा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे. जे आता धक्का देण्याचे भाष्य करतात ते कधीकाळी शिवसेनेचे खासदार होते, आम्ही त्यांना निवडून आणले होते. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला. त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणले. ते आमदार फुटणार बोलतात. त्यांचे नशीब आधीच फुटले आहे ते बघावे असा टोला संजय राऊतांनी कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर लगावला. 

Web Title: Will shock Uddhav Thackeray after Dussehra rally, except 2 MLAs, others are in touch; Eknath Shinde Sena leader Krupal Tumane claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.