तिवरे धरणफुटी सदानंद चव्हाण यांच्यावर शेकणार? तिवरे धरणप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:38 AM2019-07-04T00:38:44+5:302019-07-04T00:42:31+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे.

Will the Shankarbuti blast on Sadanand Chavan? | तिवरे धरणफुटी सदानंद चव्हाण यांच्यावर शेकणार? तिवरे धरणप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मंगळवारी रात्री तिवरे गावात निसर्गाचा प्रकोप झाला आणि प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणाची भांडाफोड झाली. मात्र, या हलगर्जीपणाची शिकार या गावातील स्थानिक जनता झाली. कुणाच्या घरात केवळ पाणीच नाही तर चिखलही साठला. जिवंत माणसं वाहून गेली अन् पै पै साठवून ठेवलेल्या पैशातून जमवलेल्या वस्तू घरातच राहिल्या. या धरणफुटीची भीषणता काळीज पिळवटून टाकणारी होती.

Next
ठळक मुद्देचव्हाण यांच्या कंपनीने निकृष्ट काम केल्याचा आरोप

प्रकाश वराडकर ।
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे.

भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही निकृष्ट दर्जाचे काम हेच तिवरे धरण फुटण्यास जबाबदार असल्याचा आरोप केला असून, मित्रपक्ष सेनेचे आमदार चव्हाण यांना घरचा आहेर दिला आहे. मात्र, या आरोपांचे आमदार चव्हाण यांनी खंडन केले आहे.

मंगळवारी रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची मुख्य भिंत कोसळून सात गावांमध्ये धरणाचे पाणी घुसले. त्यामुळे हाहाकार माजला आहे. या दुर्घटनेत २३ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, तिवरे धरण फुटण्यास कोण जबाबदार आहेत, याबाबत आता आरोप - प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. तिवरे धरणाचे बांधकाम २००० साली पूर्ण झाले असून, या धरणाचा साठा २.४५ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, या धरणाचे बांधकामच निकृष्ट झाल्याचा आरोप आता सेनेचा मित्रपक्ष भाजप, विरोधी पक्ष व स्थानिक स्तरावरही केला जात असल्याने सेना आमदार चव्हाण यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवानंतर केव्हाही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूकीची तयारी चव्हाण यांच्यासह सर्वच विद्यमान आमदारांनी सुरू केली आहे. मात्र तिवरे धरणफूटीमुळे आमदार चव्हाण विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले आहे.


जलसंपदा मंत्र्यांचा आरोप
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रसारमाध्यमांकडे बोलताना तिवरे धरण फुटण्यामागे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व धरणाचे झालेले निकृष्ट बांधकाम हे कारण असल्याचा थेट आरोप केला आहे. आपण या धरणाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मे महिन्यात दुरुस्ती झाल्याचा अहवालही आला. दुरुस्ती झाली तर धरण फुटलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराने निकृष्ट काम केले काय, अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे काय, कोण या प्रकाराला जबाबदार आहेत, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

सदानंद चव्हाण हेच लक्ष्य
स्थानिक लोक, राजकीय पक्ष, भाजप तसेच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही चिपळूणचे सेना आमदार सदानंद चव्हाण यांनाच तिवरे धरण फुटल्याच्या प्रकरणात लक्ष्य केले आहे. तसेच आमदार चव्हाण व कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

काय म्हणाले आमदार चव्हाण?
शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर तिवरे धरण फुटीनंतर झालेल्या आरोपांचे चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खंडन केले आहे. ते म्हणाले, खेमराज कन्स्ट्रक्शनचे नाव या प्रकरणात जोडले जात आहे, त्यामागे राजकारण आहे. असे राजकारण करण्याची गरज नाही. १८ वर्षांपूर्वी या धरणाचे काम झाले. गेल्या १५ वर्षांमध्ये तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. राज्यातील पहिलेच झिगझॅग प्रकारातील हे धरण आहे. १८ वर्षात अशा कोणत्याही समस्या आल्या नाहीत. धरण उभारल्यानंतर १ वर्ष देखभाल जबाबदारी आमची होती. त्यानंतर दरवर्षी संबंधित अधिकारी त्या धरणाची पाहणी करतात. तेथे कुठे काय करायला हवे हे अधिकारी ठरवतात. त्यानुसार ते पुढील कार्यवाही करतात. धरणाला अलिकडे काही समस्या होती तर ती दूर करायला हवी होती. तसे झाले नाही त्यामुळे हा मोठा अनर्थ घडला आहे. मी लोकप्रतिनिधी आहे व माझ्या भावाची कंपनी आहे. आम्ही तेथे काम करीत होतो. याचा संदर्भ घेऊन आरोप करणे चुकीचे आहे. अधिकाºयांनी नियमित धरणाची पाहणी करणे आवश्यक होते. आम्ही दरवर्षी जाऊन धरणाची व्हिजिट करावी, असा नियम नाही, असेही चव्हाण म्हणाले.

तिवरे धरणप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून, या घटनेस जबाबदार कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Will the Shankarbuti blast on Sadanand Chavan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app