संदीप नाईक पुन्हा भाजपात प्रवेश करणार?; रातोरात समर्थक नगरसेवकांनी सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 08:15 IST2025-02-19T08:14:48+5:302025-02-19T08:15:49+5:30
मंगळवारी रात्री बंडखोरी करणाऱ्या संदीप नाईक समर्थक नगरसेवकांना मुंबईत भाजपात प्रवेश देण्यात आला

संदीप नाईक पुन्हा भाजपात प्रवेश करणार?; रातोरात समर्थक नगरसेवकांनी सोडली साथ
नवी मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नवी मुंबईत गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत बेलापूर विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवली. मात्र या निवडणुकीत संदीप नाईक यांना पराभव पत्करावा लागला. आता संदीप नाईक पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संदीप नाईक लवकरच भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात असून त्यांच्यासोबत भाजपा सोडलेल्या समर्थक नगरसेवकांनी रात्री उशीरा भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत संदीप नाईकांसह ३० हून अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. संदीप नाईकांच्या पक्षप्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण झाले. या निवडणुकीत मंदा म्हात्रेंनी विजय मिळवला त्यानंतर ५ महिन्यात भाजपा सोडलेल्या संदीप नाईक समर्थक नगरसेवकांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे.
जुन्या कार्यकर्त्यांचा विरोध तरीही गणेश नाईकांची खेळी
मंगळवारी रात्री बंडखोरी करणाऱ्या संदीप नाईक समर्थक नगरसेवकांना मुंबईत भाजपात प्रवेश देण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा भाजपा प्रवेश झाला. विशेष म्हणजे दुपारी गोंधळ घालून काही जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी या माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही मात्र गणेश नाईक यांनी सूत्रे हलवल्यानंतर उशीरा हा भाजपा प्रवेश घडवून आणला आहे.
दरम्यान, या नगरसेवकांनी भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी भूमिका भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नगरसेवकांना पुन्हा भाजपात घेण्यात आलं आहे. संदीप नाईक हेदेखील भाजपावासी होतील असं सांगण्यात येत आहे.