मनसे-भाजप एकत्र येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2022 04:55 PM2022-09-04T16:55:04+5:302022-09-04T17:00:13+5:30

मनसे आणि भाजप एकत्र येणार का?, याची चर्चा रंगली आहे.

will mns bjp come together know about bala nandgaonkar and keshav upadhye reaction on it | मनसे-भाजप एकत्र येणार का?

मनसे-भाजप एकत्र येणार का?

Next

बाळा नांदगावकर, नेते, मनसे 

मध्यंतरी राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हाही राष्ट्रवादी आणि मनसेची युती होणार, अशी चर्चा रंगली होती. राज ठाकरे नव्या घरात राहायला गेले आहेत, घरी गणपती आहे,  त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना भेटायचे असते. आता राजकीय नेते घरी आले की, राजकीय चर्चा होणारच, त्यातून तुम्ही अर्थ काय काढायचा, हा तुमचा विषय आहे. 

राज ठाकरे केवळ राजकारण्यांना भेटत नाहीत, ते वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनाही भेटत असतात. एकट्याच्या जीवावर निवडणुका लढविण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे; पण दोन समविचारी पक्ष जर एकत्र येणार असतील, तर त्यात अडचण काय आहे. भाजपबरोबर पूर्वी जे पक्ष होते, ते आता बरोबर राहिलेले नाहीत. राज ठाकरेंची नवी टॅगलाइन आलेली आहे, हिंदवी रक्षक-महाराष्ट्र सेवक, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा आहे. लोक त्यांना बाळासाहेबांच्या छबीत बघतात. मी विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे, असे राज ठाकरेंनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. आता तुम्ही युतीची चर्चा सुरू केली आहे, ती मी सकारात्मक घेतो, नकारात्मक दृष्टिकोनातून घेण्याचे कारण नाही. आमच्याकडे नकारात्मक विचारच नाही. येस वुई कॅन...

केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांना भेटण्याची परंपरा आहे. राजकीय नेते एकमेकांना भेटण्यात कुणाचा आक्षेप असू नये. त्यामुळे भाजपचे नेते आणि राज ठाकरे दोघेही भेटत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? राज ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. अशा राजकीय नेत्याला भाजपचे नेते भेटत असतील तर त्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आक्षेप असण्याचे कारण नाही. 

राजकीय पक्षाचे नेते एकत्र येत असतात, एकमेकांना भेटत असतात संवाद साधत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. यातून कुणी राजकारण साधण्याचा प्रयत्न करू नये. राहिला प्रश्न मनसेबरोबर भाजपच्या युतीचा तर यासंदर्भात भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलेले आहे. आता अशा प्रकारचा कोणताही विषय नाही. या भेटीतून युती करावी किंवा करू नये असा कुठलाही विषय आता नाही. या भेटीतून कोणता अर्थ काढायचा हा माध्यमांचा अधिकार आहे. राजकीय पक्ष म्हणून या भेटीतून लगेच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. युती करू किंवा करणार नाही, असा कुठलाही विषय आज तरी समोर नाही. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर भाष्य करणे खूप घाईचे होईल. भाजप जनतेच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करतो.

शब्दांकन : दीपक भातुसे

Web Title: will mns bjp come together know about bala nandgaonkar and keshav upadhye reaction on it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.