मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:19 IST2025-07-23T09:19:33+5:302025-07-23T09:19:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब
मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदमांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या कांदिवली येथील सावली बारमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून बारबाला नाचविल्या जात होत्या. दोन वेळा बारवर कारवाई होऊनही त्यांनी कोणतेही पावले उचलली नसल्यामुळे त्यांची थेट जबाबदारी सिद्ध होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गृह राज्यमंत्री कदमांनी आईच्या नावे डान्सबार असल्याचे मान्य केले. यापूर्वी कारवाई झाली तेव्हा काही गैरप्रकार होत असल्याचे त्यांना माहीत नव्हते का? तो बार चालवायला दिला असे ते म्हणतात. पण, कायद्यानुसार प्राधिकृत व्यक्ती जबाबदार असला तरी हे कृत्य मी केले असे परवानाधारकावर बंधनकारक आहे. प्राधिकृत व्यक्तीला त्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केल्याचे सिद्ध करावे लागते. मात्र, कदम पितापुत्रांनी असे काही केले नाही. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाल्याने ती खोटी असू शकत नाही, असा दावाही परब यांनी केला.
हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार : रामदास कदम
मंत्र्यांना ३५ ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. राज्यमंत्री कदम सभागृहात नसताना हे आरोप केले. नियमबाह्य पद्धतीने हे आरोप करण्यात आले आहेत. दोन दिवस सुट्टी असल्याने बुधवारी २३ जुलैला त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात येणार आहे. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा घेऊन दाखवावा. पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे द्या. आम्ही कोणाकडे मांडवली केली हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले.
टप्प्याटप्प्याने प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा
पोलिसांच्या रेकॉर्डप्रमाणे नृत्य करताना, लगट करताना व पैसे उधळतानाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे सिद्ध करण्यासारखे काही राहिले नाही. गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्स बारवर रेड टाकतात. अश्लीलता व समाज विधायक कृती आहे म्हणून ते चांगले काम करतात. पण, स्वतःच्या आईच्या नावाने असलेल्या बारवर कोण कारवाई करणार? प्रदूषण मंडळात किती रेड झाल्या? त्याचे पुढे काय झाले? अशी कदम पितापुत्रांची अनेक प्रकरणे टप्प्या टप्प्याने बाहेर काढणार आहे, असा इशारा आ. परब यांनी दिला.