"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:32 IST2025-08-15T12:31:52+5:302025-08-15T12:32:17+5:30
राज्यातील काही पालिका हद्दीत मास-मटण विक्रीवर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
Maharashtra Politics : आज देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून १९४७ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत भारत देश बदलत गेला. भारताने सर्वच क्षेत्रात खूप प्रगती केली. पण यंदाच्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात एक विषय गाजतोय. हा विषय लोकांच्या आहाराशी संबंधित आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही पालिका हद्दीत आज मांस-मटणाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गोकुळाष्टमीचा पवित्र सण असल्याने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी अशा संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावरून वाद सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर भाजपाकडून १९८८च्या आदेशाचा दाखल देण्यात आला असून आव्हाडांनाच प्रश्न विचारण्यात आला आहे.
भाजपाचा पलटवार
"जितेंद्र आव्हाड हे सध्या नौटंकीतही पारंगत झाले आहेत. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण हा अधिकार इतरांच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याचा परवाना नसतो. लक्षात ठेवा, कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा आजचा नाही. हा निर्णय १९८८मध्ये शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाला होता. मग आज जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का?" असा खरमरीत सवाल भाजपाचे नवनाथ बन यांनी विचारला.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि स्वतः जितेंद्र आव्हाड मंत्री असताना देखील १५ ऑगस्ट, कृष्णजन्माष्टमीसह अनेक धार्मिक दिवशी कत्तलखाने बंदच होते. तेव्हा त्यांना या सगळ्याची आठवण नव्हती का? आज पवित्र कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी मटण पार्टीचे आयोजन करून त्यांनी हिंदू समाजाच्या भावनांचा अपमान केला आहे. ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर जाणीवपूर्वक केलेली धार्मिक भावनांची पायमल्ली आहे," असा आरोप त्यांनी केला.
"मी जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करतो आणि त्यांना सांगतो की, धार्मिक सण-उत्सव हा अपमानाचा नव्हे, तर आदराचा विषय आहे. हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देणारे प्रयोग थांबवा," असा इशाराही त्यांनी दिला.