will implement One country one ration card scheme says chhagan bhujbal | ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबविणार - भुजबळ

‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबविणार - भुजबळ

मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना जूनपासून राबविण्याची शक्यता आहे. राज्यातही ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, ज्या भागात स्वस्त धान्य दुकानांवर ई-पॉस मशीन नादुरुस्त आहे, तेथे लाभार्थ्यांना अन्य मार्गाने धान्य मिळावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मशीन बंद असले तरी अन्य कागदपत्रे तपासून धान्य देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

दुर्गम भागामध्ये नेटवर्क उपलब्ध नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन धान्य देण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य दिले जात नाही तेथे चौकशी करुन कारवाई केली जाईल असेही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री आशिष शेलार, संग्राम थोपटे, अतुल भातखळकर यांनी भाग घेतला.

Web Title: will implement One country one ration card scheme says chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.