दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 20:57 IST2025-10-02T20:56:13+5:302025-10-02T20:57:19+5:30
Shiv Sena Shinde Group Dasara Melava: नेस्को सेंटर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधूनरामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे आज मुंबईत पार पडले. एकीकडे दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी शिंदेगट आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. तर दुसरीकडे नेस्को सेंटर येथे झालेल्या दसरा मेळाव्यामधून शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना रामदास कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? आणि त्यांच पार्थिव किती दिवस मातोश्रीवर ठेवलं होतं. याची माहिती काढा. मी हे जबाबदारीने बोलत आहे. मोठं विधान करतोय. बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणारे डॉक्टर परकार यांना विचारून घ्या. शिवसेना प्रमुखांचं पार्थिव उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दोन दिवस का ठेवलं होतं. तुमचं अंतर्गत काय सुरू होतं? असा सवाल रामदास कदम यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले की, तेव्हा आम्ही खाली बसलो होतो. मी स्वत: मातोश्रीखालच्या बाकड्यावर आठ दिवस झोपलो आहे. पण हे सगळं कशासाठी घडत होतं. कुणीतरी सांगितलं की बाळासाहेबांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले गेले. मग हे ठसे कशासाठी घेतले गेले. काय नेमकं होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालली होती. बाळासाहेबांचं मृत्युपत्र कुणी तयार केलं. त्यावर सही कुणी केली, याचीही माहिती काढा, अशीही माझी विनंती आहे, असेही रामदास कदम म्हणाले.