काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 13:31 IST2025-08-15T13:30:09+5:302025-08-15T13:31:57+5:30

Uddhav Thackeray News: शिवसेना-कम्युनिस्ट असा संघर्ष झालेला आहे. मग समजले की, आपण उगाचच भांडत राहिलो. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

why did i join maha vikas aghadi with congress ncp uddhav thackeray revealed the big political reason | काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण

काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण

Uddhav Thackeray News: बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे नाते सर्वांना माहिती आहे. मतभेद टोकाचे आणि मैत्री तर त्या पलीकडची. म्हणजे थोडक्यात काय तर राजकारणात मतभेद आहेत, पण मतभेदाला मतभिन्नता म्हणतो. मतभिन्नता असू शकते. आता कोणी म्हणेल की, डाव्यांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कसे? कारण शिवसेना आणि कम्युनिस्ट असाही संघर्ष झालेला आहे. मात्र, कालांतराने कळते की आपण ज्या कारणासाठी लढतो ते बाजूलाच राहते आणि आपण उगाचच भांडतो, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जनसुरक्षा कायदा किती वाईट आहे किंवा या कायद्याचा दुरुपयोग कसा केला जाईल किंवा दुरुपयोग केला जाऊ शकतो, हे जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसांना पटवून देऊ शकत नाहीत, तो पर्यंत या कायद्याच्या विरोधात जनसामान्यांमधून उठाव होणार नाही. आम्ही बोललो तर सत्ताधारी काय म्हणणार की तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधात बोलणारच. हो आम्ही विरोधक आहोत, पण आम्ही तुमच्या सडलेल्या मानसिकतेच्या विरोधात आहोत. देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली. तेव्हा आमच्या समोर काँग्रेस आणि शरद पवार होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून मविआत सामील का झालो?

राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये. शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र का येऊ शकलो? तर आमच्या सर्वांमध्ये देशप्रेम हा एक समान धागा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच मला आता एक क्षणभर प्रश्न पडला की मी डावा की उजवा? अर्थात दोन्ही हात आपलेच असतात. त्यामुळे डावे आणि उजवे असे काही करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. मला जेव्हा या कार्यक्रमासाठी फोन आला तेव्हा मी कार्यक्रमासाठी हो सांगितले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, महायुती सरकारच्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी या परिषदेला हजेरी लावत सक्रिय पाठिंबा दर्शविला. मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रतिगामी शक्तींना दूर ठेवण्याची काळजी घेऊ आणि राज्य सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, असेही शरद पवार म्हणाले. जनसुरक्षा कायद्याला विधानसभेत अपेक्षित विरोध झाला नसल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Web Title: why did i join maha vikas aghadi with congress ncp uddhav thackeray revealed the big political reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.