शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:04 IST2025-10-09T06:04:17+5:302025-10-09T06:04:44+5:30
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार होती.

शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह कुणाचे या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. यावर आता १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सूर्य कांत, न्या. उज्ज्वल भुयान आणि न्या. एन. के. सिंग यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
‘...त्यावर सरन्यायाधीशांची परवानगी घ्या’
उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली की, जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यावर सुनावणी होणे अत्यावश्यक आहे. यानंतर न्या. सूर्यकांत यांनी १२ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली.
सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवरही सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. यावर न्या. सूर्यकांत यांनी सिब्बल यांना सरन्यायाधीशांची परवानगी घेण्याचा सल्ला दिला. मुकुल रोहतगी यांनी शिंदे गटाची बाजू मांडली.
न्या. सूर्यकांत यांनी पुढची सुनावणी १२, १३ आणि १४ नोव्हेंबर अशी तीन दिवस घेऊ, असे म्हटले आहे.
- असिम सरोदे, उद्धवसेनेचे वकील