'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:36 IST2025-01-06T17:34:44+5:302025-01-06T17:36:41+5:30
Dhananjay Munde Ajit Pawar News: महायुतीच्या सरकारमधील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यात सोमवारी (६ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.

'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका
Santosh Deshmukh Dhananjay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सत्ताधारी महायुतीतील आमदारांसह विरोधी आमदार आणि नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही मागणी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी राज्यापालांची भेट घेतली असून, याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी भेटीबद्दल आणि या प्रकरणावर भूमिका मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात सोमवारी तासभर बैठक झाली. पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. नवीन वर्षी अजित पवार इथे नव्हते, आज मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. माझ्या खात्याचा सगळा आढावा त्यांच्यासमोर मांडला."
मी कोणा-कोणाचे तोंड धरणार? धनंजय मुंडेंचा धसांवर अप्रत्यक्षपणे पलटवार
होत असलेल्या आरोपावर धनंजय मुंडे म्हणाले, "या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही. कुणी काय आरोप करावेत, हे लोकशाहीला प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की, जे आरोप करताहेत, ते ज्या पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा. ते महायुतीत भाजपचे आमदार असतील, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावं", असा पलटवार धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता केला.
मुख्यमंत्र्यांनी तशा चौकश्या नेमल्या -मुंडे
एसआयटीतील अधिकारी वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावर धनंजय मुंडे म्हणाले, "खरं सांगू का? अधिवेशनात ज्या लोकांना मागणी केली होती की, अशी अशी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तशा चौकश्या नेमल्या आहेत. त्या तपासात, ज्यावेळी माझ्याकडे संशयाने बघितले जाते, त्यावेळी मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही."
"अतिशय व्यवस्थित तपास सुरू आहे. तपास पूर्ण होऊद्या. हे सगळं फेक नरेटिव्ह आहे. मीडिया ट्रायल सुरू आहे. माझं म्हणणं आहे की, कोर्टात ट्रायल होऊ द्या", असे धनंजय मुंडे म्हणाले.