"पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे", काँग्रेसची आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:11 IST2023-02-11T15:10:22+5:302023-02-11T15:11:10+5:30
Shashikant Warishe Murder Case: पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आलेली असली तरी या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? हे जनतेसमोर आले पाहिजे.

"पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे", काँग्रेसची आक्रमक भूमिका
मुंबई - रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या संशयास्पद आहे. या हत्येमागे कोणा कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड होणे गरजेचे आहे. वारिशे हत्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आलेली असली तरी या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? हे जनतेसमोर आले पाहिजे. यासाठी शशिकांत वारिशे हत्याप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश यांच्या देशरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरीचा प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे, यासंदर्भात पत्रकार शशिकांत वारिशे बातम्या देत होते. यातूनच ही हत्या झाल्याचे दिसत असले तरी या हत्यमागे कोणाचे हितसंबंध दडलेले आहेत? या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता का? रिफायनरी समर्थकांकडून ही हत्या झाली आहे का? यात राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का? या व अशा अनेक मुद्द्यांचा तपास झाला पाहिजे.
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीच्या सभेत रिफायनरी होणारच कोण अडवतेय ते पाहू असे जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासात ही हत्या झाली, हे संशयास्पद वाटत आहे. या सभेमुळे हत्या करण्यास प्रेरणा मिळाली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे वारिशे यांच्या हत्येचा सखोल तपास होऊन गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असेही लोंढे म्हणाले.