मराठवाड्याची ५२५ कोटींची मदत देणार कुठे-कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:41 IST2019-01-29T04:56:50+5:302019-01-29T06:41:35+5:30
पहिल्या टप्प्यातील दुष्काळनिधी; नियोजनाचा अभाव; निवडणुकीनंतर दुसरा हप्ता

मराठवाड्याची ५२५ कोटींची मदत देणार कुठे-कुठे?
औरंगाबाद : मराठवाड्यात कमी पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम वाया गेला असून, विभागात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने २,५६४ कोटी ९१ लाख रुपयांची एकूण तरतूद बाधित शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्यातून ५२५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा मिळणार आहे. या मदतीचे वाटप कशी व कुठे करायची याचे नियोजन नसल्यामुळे त्याचे वितरित कसे करणार हा प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत दुष्काळ मदत निधी अडकला तर आचारसंहितेनंतरच दुसरा हप्ता येण्याचा मार्ग मोकळा होण्याचे प्रशासकीय संकेत आहेत.
ही मदत थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, यातून बँकेने कुठलीही वसुली करू नये, असे २५ जानेवारीच्या शासन अध्यादेशात म्हटले आहे. शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हप्त्यात मदत करण्यात यावी. प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ५० टक्के म्हणजेच ३४०० रुपये प्रतिहेक्टर रक्कम शेती पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रथम देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बीडमध्ये १२६ कोटी तर औरंगाबादमध्ये १११ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहेत. त्याखालोखाल जालन्यात ९७ कोटींचे वाटप होईल.
जवळपास सर्व बाधित शेतकºयांपर्यंत ही मदत पोहोचेल. मंडळनिहाय, गावनिहाय कामांचा आढावा घेऊन मदत निधी वाटप होईल. निधी वाटपाला विलंब होऊ नये, अशा सूचना विभागीय पातळीवर दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
लातूर, नांदेडला सर्वात कमी निधी
मराठवाड्यात लातूर, नांदेडला सर्वाधिक कमी निधी मिळाला आहे. लातूरसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले असून, ३ कोटी ३१ लाख पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत.
नांदेड जिल्ह्यासाठीही ५१.५१ कोटी मंजूर झाले असून, त्याचा पहिला टप्पा २५.७५ कोटींचा राहणार आहे.
लातूर जिल्ह्यात खरिपाचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असताना केवळ ६ कोटी रुपये मदत शासनाकडून जाहीर झाली. ही बाब दुजाभाव करणारी असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे म्हणाले.