मालेगाव महानगपालिकेमधील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लावण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे या फोटोला भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला होता. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात भाजपाने जोरदार टीका केली आहे. आता भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलनात यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत भाजपाने या दोघांमध्ये कुठे आणि कसली समकक्षता आहे, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांना विचारला आहे.
यासंदर्भात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमधून सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. यात उपाध्ये यांनी लिहिलं की, इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची परंपराच आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्य, महाराज म्हणजे अस्मिता, किल्ल्यांची अभेद्य साखळी, आरमाराची निर्मिती, शिस्तबद्ध महसूल व्यवस्था, स्त्री सन्मानाची कठोर चौकट !! अठरापगड, बारामावळ जनतेचे रक्षण करणारे द्रष्टे नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. तर टीपू सुलतान म्हणजे काय? असंख्य अत्याचार, जबरदस्तीची धर्मांतरे, हजारो हिंदूंची कत्तल, इस्लामी साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा म्हणजे टीपू होय. मग कुठे आणि कसली समकक्षता आहे महाराज आणि टीपूमध्ये, हर्षवर्धन सपकाळजी? अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली.
केशव उपाध्ये पुढे लिहितात की, हिंदू अस्मितेला कमी लेखण्याचे, तिला डावलण्याचे काँग्रेसी षड्यंत्र आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. म्हणूनच, काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा वाटतो. औरंगजेबाच्या प्रेमापोटी छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध केला जातो आणि धर्मांध टीपूला महाराजांच्या समकक्ष ठरविण्याचे धाडस केले जाते, असा दावा उपाध्ये यांनी केला.
दरम्यान, महमद घोरी असो, टीपू असो किंवा औरंगजेब असो, देशाच्या अस्मितेवर, संस्कृतीवर घाला घालणारे कधीच नायक होऊ शकत नाहीत. त्यांना नायकत्व देण्याचा कॉंग्रेसचा लाळघोट्या कट जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही केशव उपाध्ये यांनी केला.
Web Summary : BJP criticizes Congress leader Harshvardhan Sapkal's comparison of Shivaji Maharaj to Tipu Sultan. BJP's Keshav Upadhye highlights the differences between Shivaji's progressive rule and Tipu's tyranny, questioning the basis of Sapkal's comparison and Congress's motives.
Web Summary : भाजपा ने कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल द्वारा शिवाजी महाराज की टीपू सुल्तान से तुलना की आलोचना की। भाजपा के केशव उपाध्ये ने शिवाजी के प्रगतिशील शासन और टीपू के अत्याचारों के बीच अंतर को उजागर करते हुए सपकाल की तुलना और कांग्रेस के इरादों पर सवाल उठाया।