'ज्या ज्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी...'; बावनकुळेंचं विरोधकांबद्दल मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:44 IST2025-01-20T19:42:37+5:302025-01-20T19:44:58+5:30
Maharashtra News: राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही मुद्द्यांवरून विरोधकांवर टीकेचे बाण डागले.

'ज्या ज्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी...'; बावनकुळेंचं विरोधकांबद्दल मोठं विधान
Marathi batamya: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना दिसत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर आज महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच भडकले. विरोधकांचा हा डाव असल्याचे सांगत त्यांनी प्रत्युत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. त्यांचा मानसिक पराभव झाला आहे. त्यामुळेच विरोधक सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे तसेच बीड आणि परभणी येथील घटनांचे राजकारण करत आहेत. वास्तविक, अशा घटनांचे कोणीही अजिबात राजकारण करू नये. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी आमच्या महायुतीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपली महाविकास आघाडी कशी टिकेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज', अशा शब्दात बावनकुळेंनी विरोधकांवर हल्ला चढवला.
त्या त्या वेळी महाराष्ट्र अशांत केला जातो -बावनकुळे
"ज्या ज्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी काही घटकांकडून महाराष्ट्र अशांत केला जातो. पण, विरोधकांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याला पुरून उरतील", असे ते विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले.
'पालकमंत्री पदावरून वाद नाहीत'
पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. या मुद्द्यावर ते म्हणाले की, "महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत, काही कुरबुरी असतील त्यावर चर्चेतून मार्ग निघेल. सातारा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ येथे आमचे मंत्री असतानासुद्धा शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्यात आले आहे."
"पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला", असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.