लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:35 IST2025-12-15T14:33:49+5:302025-12-15T14:35:32+5:30
Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच, राजकीय वातावरण तापले आहे.

लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच, राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, भाजप जनतेची फसवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
निवडणुकांपूर्वी भाजपने केलेल्या प्रमुख घोषणा पूर्ण न झाल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु, दुर्दैवाने अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपयांचा हप्ता जमा झाला नाही," असे स्पष्ट करत त्यांनी या आश्वासनाच्या पूर्ततेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतानाही भाजपने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पाळले नाही, अशी टीका त्यांनी केली. "शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नाहीच, पण मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही," असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही लोकांना खोट्या घोषणा दिल्या जात असल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला. "भाजपच्या सर्व घोषणा फसव्या आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही खोट्या घोषणा दिल्या जात आहेत," असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला. मनपा निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा मुद्दा उपस्थित करून मतदारांना भाजपच्या विरोधात संघटित करण्याचा प्रयत्न केला.