संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आधीच बघितले होते का? CM फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:15 IST2025-03-05T17:12:04+5:302025-03-05T17:15:01+5:30

Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Photos: संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले. हे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच बघितले होते, असे दावे आणि आरोप विरोधकांकडून करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. 

When did Chief Minister Devendra Fadnavis see the photos and videos of Santosh Deshmukh's murder? | संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आधीच बघितले होते का? CM फडणवीस म्हणाले...

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आधीच बघितले होते का? CM फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis Santosh Deshmukh Case in Marathi: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली, याचे व्हिडीओ आणि फोटोच समोर आले. सीआयडीच्या आरोपपत्रातील हे फोटो माध्यमे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. पण, हे फोटो मुख्यंमत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आधीच बघितले होते, मग राजीनामा का घेतला नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हे फोटो कधी बघितले? याबद्दल आता मुख्यमंत्री फडणवीसांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत संतोष देशमुखांचे फोटो आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. 

मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी इतका वेळ का लागला?

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. या प्रकरणात संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले. जनक्षोभ झाला आणि तुमची बैठक होऊन हा राजीनामा झाला. लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे की याला इतका वेळ का लागला? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. 

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "पहिली गोष्ट ही आहे की लोक व्यवस्था (सिस्टीम) समजून घेत नाही. ज्यावेळी ही घटना घडली आणि घटनेनंतर जेव्हा मी सीआयडी तपासाची घोषणा केली. मी सीआयडीच्या लोकांना स्पष्ट शब्दात सांगितले होते की, या प्रकरणात अजिबात हस्तक्षेप केला जाणार नाही. तुम्ही पूर्ण शक्तिनिशी पुढे जा."

सीआयडीने खूप चांगल्या पद्धतीने तपास केला -फडणवीस

याच मुद्द्यावर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, "सीआयडीने खूप चांगल्या पद्धतीने तपास केला. आमच्या फॉरेन्सिक टीमने जे मोबाईल हरवले होते आणि ज्या मोबाईलमधून माहिती डिलिट करण्यात आली होती. त्या मोबाईलमधून पूर्ण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळवली. आज या सगळ्या गोष्टी, फोटो जे लोकांसमोर येत आहेत. ते कुणी शोधून काढलेले नाहीत. ते पोलिसांनी स्वतः शोधलेले आहेत आणि ते आरोपपत्राचा भाग आहेत", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आरोपपत्र दाखल झाल्यावर मी फोटो बघितले - CM फडणवीस

"मला हे वाटतं की, या संपूर्ण प्रकरणात सीआयडीने खूप चांगल्या प्रकारे काम केलं. आमचा यात कोणताही हस्तक्षेप नव्हता. आरोपपत्र ज्या दिवशी दाखल झाले, त्याच दिवशी मला माहिती मिळाली की तपासात काय आढळून आले आहे. तोपर्यंत माहिती नव्हते. मी गृहमंत्री आहे, पण मी एकदाही त्यांना म्हणालो नाही की, तुम्ही मला सांगून करा किंवा मला दाखवून काम करा", असा भूमिका फडणवीसांनी मांडली. 

तुम्ही फोटोही बघितले नव्हते का? असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना करण्यात आला. 

फडणवीस म्हणाले, "अजिबात नाही. ते मी आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतरच मी ते बघितले. कारण यामध्ये हे गरजेचे होते की, मी जर त्यात सॅनिटाईज (हस्तक्षेप) केलं नाही, तर दुसरं कोणी हिंमतही करणार नाही आणि दुसऱ्या कोणाची हिंमतही नव्हती", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   

Web Title: When did Chief Minister Devendra Fadnavis see the photos and videos of Santosh Deshmukh's murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.