राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर नार्वेकरांचा निकाल काय असेल? उज्ज्वल निकमांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:31 IST2024-02-15T15:30:48+5:302024-02-15T15:31:39+5:30
NCP MLA Disqualification Update: निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष जाहीर केला, त्यावर शरद पवारांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती आणायला हवी होती. तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे निकम म्हणाले.

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर नार्वेकरांचा निकाल काय असेल? उज्ज्वल निकमांचे भाकीत
राष्ट्रवादी कोणाची, पक्षचिन्ह कोणाचे याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आज विधानसभा अध्यक्षांचा आमदार अपात्रतेवरील निकाल येणार आहे. थोड्याच वेळात नार्वेकर निकालाचे वाचन सुरु करण्याची शक्यता आहे. हा निकाल काय असेल, काय केले असते तर चित्र वेगळे दिसले असते यावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाकीत केले आहे.
निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष जाहीर केला, त्यावर शरद पवारांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती आणायला हवी होती. तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे निकम म्हणाले. शिवसेनेच्यावेळी नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावरूनच निर्णय दिला होता, असेही ते म्हणाले.
अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाने दोन्ही गटांनी घटनेचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. हे कारण आपल्यादृष्टीने चुकीचे असल्याचे मत निकम यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचे उद्दिष्ट काय यावरही दोन्ही गटांनी काही पुरावे दिले नाहीत, यामुळे ते देखील आयोगाने विचारात घेत नसल्याचे म्हटले होते. पक्ष संघटना कोणाच्या ताब्यात आहे याकडे पाहून आयोगाने निर्णय दिला होता, असे निकालावरून लक्षात येते, असे निकम यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय देताना निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतात की राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना पक्षाचा प्रतोद कोण होता हे विचारात घेणे महत्वाचे ठरणार आहे, असे निकम यांनी सांगितले. याचबरोबर आमदार अपात्र प्रकरणी नार्वेकरांनी शिवसेनेबाबत जी भुमिका घेतली, सर्वांना खूश ठेवण्याची, तशीच आताही घेतील, असाही अंदाज निकम यांनी व्यक्त केला आहे.