रेल्वे परिसरातील रूळ, खांब विकले, ३०२ कोटींहून अधिक कमावले; भंगारातून मिळाला मोठा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:08 IST2025-11-03T15:08:34+5:302025-11-03T15:08:34+5:30
Western Railway News: भंगार साहित्य विकून रेल्वेने तब्बल ३०२ कोटींहून अधिकची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वे परिसरातील रूळ, खांब विकले, ३०२ कोटींहून अधिक कमावले; भंगारातून मिळाला मोठा महसूल
Western Railway News: केवळ तिकीट विक्रीतून नाही, तर अनेक मार्गांने भारतीय रेल्वे कमाई करत असते. यामध्ये अनेकविध गोष्टींचा समावेश असतो. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करूनही रेल्वे कोट्यवधींची कमाई करत असते. गेल्या काही वर्षांपासून ही मोहीम रेल्वेने कडक केली असून, यातून कोट्यवधींची कमाई रेल्वेची होत असते. यातच भंगार साहित्य विकूनही रेल्वेने तब्बल ३०२ कोटींहून अधिकची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे परिसर, आगार, कारखान्यातील लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली. तसेच रेल्वे रुळाचे भाग, पडीत खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे.
पश्चिम रेल्वेला ३०२ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला
पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागांतील भंगाराची विक्री करण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गंत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात येत आहे. भंगार विक्रीतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत पश्चिम रेल्वेला ३०२ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
दरम्यान, भंगार विक्रीची कामगिरी रेल्वे मंडळाच्या निश्चित केलेल्या प्रमाणित लक्ष्यापेक्षा अंदाजे २१ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य झाली होती. त्यावेळी पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती, अशी माहिती देण्यात आली.