पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:24 IST2019-02-05T11:20:27+5:302019-02-05T11:24:53+5:30
सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले
पुणे : पश्चिम बंगालमधील चीट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले. हा अत्यंत चुकीचा प्रकार असल्याचे परखड मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अशा घटनांमुळे देशात कायद्याच राज्य आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपुर्वी झालेल्या शारदा आणि रोझ व्हॅली या घोटाळ्याप्रकरणी स्थानिक पोलीस आयुक्तांचा जबाब नोंदविण्यासाठी गेलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कारवाई विरोधात धरणे आंदोलन करीत असल्याचे जाहीर केले. देशाची संघीय रचना मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्या पार्श्वभूमीवर बोलताना गोडबोले म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन अतिशय चुकीचे आहे. सीबीआय ही केंद्रीय संस्था आहे. तिचा अधिकार हा केंद्रीय प्रदेशांपुरताच मर्यादित आहे. सीबीआयला एखाद्या स्थानिक गुन्ह्याची चौकशी करायची असल्यास, संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असते. मात्र, संंबंधित चीट फंड घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असून, त्यात मोठमोठे राजकीय नेते देखील गुंतलेले असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणी चौकशी करीत नसल्याने काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सीबीआय टाळू शकत नाही.
आपण संघ राज्य आहोत. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच सीबीआयच्या कारवाई विरोधात धरणे धरत असेल, तर कसे चालेल. या पुर्वी देखील दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलन केले होते. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती अशा पद्धतीने वागत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे. हे कायद्याचे राज्य आहे. अशा प्रकरणाला देखील राजकीय रंग दिला जातो. या पद्धती विरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला हवी. मात्र, आजकाल विरोधात असल्यावर सीबीआय सरकारच्या हातातील बाहुले झाले असल्याची ओरड केली जाते. फक्त आपण कोणत्या बाकावर आहोत, हे पाहून राजकीय व्यक्ती प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत असल्याचे गोडबोले म्हणाले.