हवामान अनुकूल; मान्सून उद्या केरळात दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:14 AM2019-06-07T02:14:32+5:302019-06-07T06:41:55+5:30

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेची लाट होती.

Weather friendly; Monsoon will be admitted to the city tomorrow | हवामान अनुकूल; मान्सून उद्या केरळात दाखल होणार

हवामान अनुकूल; मान्सून उद्या केरळात दाखल होणार

googlenewsNext

मुंबई : श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून पुढे सरकण्यासाठीचे हवामान अनुकूल असून, मान्सूनचा हाच वेग कायम राहिला तर ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे देशासह राज्याच्या विशेषत: मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत असून, वाढती आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे. गुरुवारी कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे ८१, ६५ आर्द्रता नोंदविण्यात आली असून, ३५.१ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यासह विदर्भाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, ७ आणि ८ जून रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल. ९ आणि १० जून रोजी विदर्भात उष्णतेची लाट राहील. ७ आणि ८ जून रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

मागील २४ तासांतील हवामान
- लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम, अंदमान व निकोबार द्वीपसमूह, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी.
- पंजाब, हरयाणा आणि उत्तर राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची नोंद.
- मध्य प्रदेश, विदर्भ, राजस्थान तसेच ओरिसाचा काही भाग, तेलंगणा, छत्तीसगड येथे उष्णतेची लाट.

येत्या २४ तासांत काय होणार?
- जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर कमी होईल.
- पंजाब, हरयाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहील.
- उत्तर राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येईल.
- पंजाब, हरयाणा आणि दिल्लीमध्ये उष्णतेची लाट येईल. काही ठिकाणी पाऊस पडेल.
- दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढेल.
- सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडेल.
- सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.
- उत्तर व उत्तर पश्चिम दिशेने वाहणारे गरम आणि कोरडे वारे हे उष्णतेच्या लाटेस कारणीभूत ठरतील.
- त्रिपुरा, मेघालय आणि पश्चिम आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.
- झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
- पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हवामान कोरडे राहील.
- लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता आहे.

Web Title: Weather friendly; Monsoon will be admitted to the city tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.