विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस सुरू आहे. काल गुरुवारी सभागृहाच्या परिसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही बाजूंनी मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, आता विधानसभेतील गोंधळ आणि हाणामारीवर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी टीका केली आहे.
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
या घटनेची खिल्ली उडवत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या कॅप्शनमध्ये 'लॉब्रेकर्स' असे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी विधानसभेतील हाणामारीच्या क्लिप्स वापरल्या आहेत आणि त्यांचे वादग्रस्त गाणे 'हम होंगे कामयाब' पार्श्वभूमीत ठेवले आहे. व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फुटेजचा देखील समावेश केला.
कुनाल कामरा याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने 'हम होंगे कामयाब हे टीप्पणी करणारे गाणे पोस्ट केले आहे.
याआधीही टीका केली होती
कुणाल कामराने मार्चमध्ये त्याच्या 'हम होंगे कामयाब' या स्टँड-अप शोमधील एक गाणे गायले होते, यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'देशद्रोही' म्हटले होते. या शोनंतर मोठा गोंधळ उडाला. मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये शिवसेना युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, तिथे कामराचा शो आयोजित करण्यात आला होता. प्रचंड गोंधळ असूनही, त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि हिंसाचाराचा निषेध केला. आता कामराचा हा नवीन व्हिडीओ त्यांच्या राजकीय टीकेचा एक भाग मानला जात आहे.
समर्थकांना हाणामारी प्रकरणी अटक
विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रत्येकी एका समर्थकाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी विधानभवनात आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश टकले याला अटक केली आहे.