Sunetra Pawar: आपण दोघी समदुःखी; सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:58 IST2026-02-03T10:56:26+5:302026-02-03T10:58:59+5:30
Sunetra Pawar Meet Vidip Jadhav’s Wife: बारामती येथील दुर्दैवी विमान दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघातात राज्याने आपल्या लाडक्या नेत्याला, अजितदादांना गमावलं, तर जाधव कुटुंबाने आपला आधार, विदीप जाधव यांना गमावले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे जाऊन दिवंगत सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

Sunetra Pawar: आपण दोघी समदुःखी; सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्वन
लोकमत न्यूज नेटवर्क
तरडगाव (जि. सातारा) : ‘जसे तुझे पती तुला दिसत नाहीत. तसे माझे पण पती मला दिसत नाहीत. ते माझ्याजवळ नाहीत. दोघांनी जगाचा निरोप घेतला आहे. आपण दोघी समदुःखी आहोत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांचे सुरक्षारक्षक दिवंगत विदीप जाधव यांची पत्नी संध्या यांचे सांत्वन केले. पवार कुटुंबीय हे जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देत त्यांनी धीर दिला.
बारामती येथे बुधवारी झालेल्या विमान दुर्घटनेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश आहे. यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी दुपारी तरडगाव येथे आल्यानंतर थेट जाधव यांच्या घरी गेल्या. विदीप यांची मुलगी नेत्रा व मुलगा अद्विक यांच्या पाठीवरून सुनेत्रा पवार यांनी मायेने हात फिरवला. यावेळी विदीप यांचे वडील दिलीप, चुलते संजय यांच्याशी चर्चा करीत सांत्वन केले. तर पत्नी संध्या यांना धीर दिला.
१५ मिनिटे संवाद
घरातील मंडळीची माहिती घेत सुनेत्रा यांनी सर्वांची विचारपूस केली. जाधव अन् पवार कुटुंबीय एकच आहेत. मुलांचे शिक्षण व पत्नीच्या नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. दुखवट्याचा कालावधी झाल्यावर तुम्ही माझ्याकडे भेटावयास या, असे त्यांनी सांगितले. एका खोलीत पंधरा मिनिटे सुरू असलेल्या चर्चेदरम्यान कोणाला आत सोडले जात नव्हते.