मुंबई, पश्चिम महाराष्ट्रावर जलसंकट; मराठवाडा, विदर्भात यंदा पाण्याची स्थिती आशादायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 06:03 IST2020-07-29T06:03:32+5:302020-07-29T06:03:56+5:30

पश्चिम महाराष्ट्रात मात्र धरणे भरण्याची चिंता; मुंबईच्या तलाव क्षेत्रात केवळ ३३ टक्के पाणी

The water situation in Marathwada and Vidarbha is hopeful this year | मुंबई, पश्चिम महाराष्ट्रावर जलसंकट; मराठवाडा, विदर्भात यंदा पाण्याची स्थिती आशादायी

मुंबई, पश्चिम महाराष्ट्रावर जलसंकट; मराठवाडा, विदर्भात यंदा पाण्याची स्थिती आशादायी

योगेश बिडवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी दुष्काळाच्या छायेत असणारा मराठवाडा तसेच विदर्भा$त यंदा जुलैअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती गेल्या वर्षीपेक्षा खूपच आशादायी असल्याचे जलसंपदा विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित पाऊसमान नसल्याने गेल्या वर्षी ५० टक्क्यांवर असलेला धरणांतील पाणीसाठा यंदा अवघा ३४ टक्के आहे. आॅगस्ट, सप्टेंबरनंतर अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यास धरणे भरण्याची चिंता आहे.


राज्यात मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांची एकूण संख्या ३,२६७ आहे. त्यात १४१ मोठी धरणे, २५८ मध्यम तर २,६६८ छोटी धरणे आहेत. राज्यात २८ जुलैपर्यंत मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ४२.२८, मध्यम प्रकल्पात ३८.११ तर छोट्या प्रकल्पात १६.७७ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय
- कोयना धरणापासून सर्व प्रकल्पांत नियोजनानुसार साठा ठेवला जात आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली होती. त्यानंतर दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे पुराचे नियंत्रण करण्यासाठी समित्यांची निर्मिती केली आहे. दोन्ही राज्यांच्या सचिव पातळीवर समिती नेमण्यात आली आहे. त्यात उत्तम समन्वय ठेवला जात आहे.


मुंबई : मोठे तलाव निम्मे रिकामेच
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वांत लहान असलेला तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. आतापर्यंत सर्व तलावांमध्ये एकूण चार लाख ७३ हजार दशलक्ष लीटर साठा जमा झाला आहे. मात्र मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा हे मोठे तलाव निम्मेच भरले आहेत.
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सातही तलावांमध्ये १ आॅक्टोबरला १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. यंदा तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने चिंता वाढली आहे.


मराठवाडा : 0 वरून ३४%
मराठवाड्यात गेल्या वर्षी २८ जुलैला धरणांमध्ये एक टक्काही उपयुक्त पाणीसाठा नव्हता. यंदा तो ३४ टक्क्यांवर गेला आहे. पैठण धरणात जुलैत शून्य टक्के साठा होता. यंदा तो तब्बल ४४% आहे.

विदर्भ : नागपूर विभागात ४९%
विदर्भातही गेल्या वर्षी १० टक्क्यांच्या खाली जलसाठा होता. यंदा तो अमरावती विभागात
३४ तर नागपूर विभागात तब्बल ४९ टक्के झाला आहे.

उत्तर महाराष्ट्र : समाधानकारक जलसाठा
उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या २६.०४ टक्क्यांच्या तुलनेत यंदा काहीसा समाधानकारक ३४.३८ टक्के जलसाठा झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्र : पाणी संकटाच्या छायेत
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत जलाशयांत कमी पाणी जमा झाले आहे. गेल्या वर्षी जुलैअखेर ४७.८७ टक्के असलेला साठा यंदा ३४.२२ टक्केच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे.

 

Web Title: The water situation in Marathwada and Vidarbha is hopeful this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.