पाणीच पाणी... हानीच हानी..., राज्यात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा, विदर्भातही फटका, कोकणात संततधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 09:33 IST2025-08-30T09:32:57+5:302025-08-30T09:33:25+5:30
Heavy Rain In Maharashtra News: गेले दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाचे धुमशान सुरूच असून मराठवाडचात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नांदेड शहराचा काही भाग जलमय झाला आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पाणीच पाणी... हानीच हानी..., राज्यात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा, विदर्भातही फटका, कोकणात संततधार
मुंबई - गेले दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाचे धुमशान सुरूच असून मराठवाडचात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नांदेड शहराचा काही भाग जलमय झाला आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात १३० मंडळांत अतिवृष्टी झाली असून २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. लातूर जिल्ह्यात ९१ तर नांदेड जिल्ह्यात १३२ मि.मी. रेकॉर्डब्रेक पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आला. जिल्ह्यातील १६ पैकी १३ तालुक्यांमधील ६९ मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेडमध्ये शेकडो दुकाने, घरातही पाणी शिरले होते. गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.
वह्या-पुस्तके ठेवली वाळत
नायगाव शहर परिसरात २८ ऑगस्टला आलेल्या पुरामुळे अनेक दुकानांमधील साहित्यासह घरांमधील शालेय साहित्यही भिजले. यामुळे जुन्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपळगावला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची पुस्तके पाण्यात भिजल्याने त्यांनी चक्क पुस्तकांचेच असे वाळवण मांडले होते.
९० लाख हेक्टरवरील पिके धोक्यात
अकोला: अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत आहेत. सर्वात जास्त पेरणी ८८ लाख २,०००-हेक्टरवर कापूस, सोयाबीनची पिके असल्याने ती धोक्यात आली आहेत. राज्यामध्ये यंदाच्या खरिपात १४२.७६ लाख हेक्टरवर सरासरीच्या ९९ टक्के पेरणी झाली आहे.
१९२
महसूल मंडळांमध्ये २९ ऑगस्टला ६५ मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.
१९८
तालुक्यांत १ जून ते २९ ऑगस्टपर्यंत १००% पेक्षा अधिक पाऊस झाला. काही भागांत आठ-दहा दिवस मुसळधारची नोंद झाली.
११७
तालुके राज्यात असे आहेत, की जेथे ११७ टक्के पावसाची नोंद झाली. ३९ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के नोंद झाली. यामुळे पिके बुरशीजन्य रोगाला बळी पडत आहे. कापसासह इतर सर्वच पिकांची हीच अवस्था आहे.
लातूर, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टी
लातूरमधील ३६ महसूल मंडळे, बीडमधील १६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार मंडळांत अतिवृष्टीची झाली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पश्चिम वन्हाडात पिकांचे मोठे नुकसान
वन्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा बसला. मूर्तिजापूरमध्ये एक महिला वाहून गेली. यवतमाळ जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस पूर्णतः थांबलेला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात १७ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
'सांगा साहेब... आम्ही आता जगायचं कसं? बियाण्यांचे कर्ज, खताची उथारी कशी फेडू? घर चालवायचं कसं? हा हंबरडा आहे मानोरा तालुक्यातील धनराज म्हातरमारे यांचा. २८ व २९ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी स्वरूपाच्या पावसाने त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरवले. म्हातरमारे यांच्या दोन एकर शेतात जोपासलेले सोयाबीन आणि तूरपिके काही दिवसांपूर्वी चांगल्या अवस्थेत होती. चांगल्या उत्पादनाचे स्वप्न रंगवत असतानाच नाल्याचे पाणी शेतात शिरले अन् काही तासांतच संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले.