Ashish Shelar : अमित शाहंच्या 'त्या' भाषणाची क्लिप लिक झाली, की केली गेली? शेलारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:32 IST2022-09-15T15:28:46+5:302022-09-15T15:32:50+5:30
मुंबईतील 'त्या' बैठकीनंतर अमित शाह यांच्या भाषणाच्या क्लिप्स जबरदस्त व्हारल झाल्या होत्या. यासंदर्भात आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाष्य केले आहे.

Ashish Shelar : अमित शाहंच्या 'त्या' भाषणाची क्लिप लिक झाली, की केली गेली? शेलारांनी स्पष्टच सांगितलं
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह गेल्या 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पांच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या बैठकीत मार्गदर्शनही केले होते. या बैठकीनंतर त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स जबरदस्त व्हारल झाल्या होत्या. यासंदर्भात आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाष्य केले आहे. ते लोकमतसोबत बोलत होते.
अमित शाह मुंबईत आले आणि बैठक घेतली. यानंतर त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स लिक झाल्या. म्हणजे येथे भाषण झाले आणि तेथे माध्यमांसमोर क्लिप लिक झाल्या. आपण मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात, आपल्या कार्यकाळात हे सर्व होत आहे, आपल्याला नाही वाटत हे मोठे ब्लंडर आहे? असे विचारले असता, शेलार म्हणाले, "आपल्याला कुणी सांगितलं, की आम्हाला हे चुकीचं झालं आहे, असं वाटतंय?" यावर आपण चौकशी लावली, असे विचारले असता, "मी अशा काहीही चौकशीचे बोललेलो नाही. मी आज पहिल्यांदाच यावर बोललो आहे. एवढेच नाही, तर राजकारणात अनेक हातखंडे वापरायचे असतात, अभी तो शुरुवात है सर...", असेही शेलार म्हणाले.
'त्या' बैठकीत काय म्हणाले होते अमित शाह? -
२०१९ च्या निवडणूक निकालानंतर अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द मोडला, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा करत अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. "ज्यांना धोका सहन करण्याची सवय असते ते आपले स्थान कधीही मजबूत करू शकत नाहीत. जो धोका देतो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. उद्धव यांनी आपल्याला धोका दिला. जनमताचा अनादर करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविले. आता त्यांना जमीन दाखवा. राजकारणात सगळे सहन करा पण धोका सहन करू नका. मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेने भाजपचा आणि जनतेचाही विश्वासघात केला," असे शाह यांनी म्हटले होते.