येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 20:06 IST2020-07-28T19:53:37+5:302020-07-28T20:06:59+5:30
राज्यात २९ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
पुणे : मुंबईसह कोकणात सध्या जोरदार पाऊस पडत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. येत्या २४ तासात कोकणासह कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील घाट परिसर तसेच अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात प्रामुख्याने जोरदार पाऊस झाला आहे. दापोली, हर्णे, उरण येथे १००, खेड, श्रीवर्धन, वसई येथे ७० मिमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, ओझरखेडा येथे ३० मिमी तर, मराठवाड्यातील बीड ४०, धारुर २०, चाकूर, लातूर येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती.
मंगळवारी दिवसभरात मुंबई कुलाबा येथे ८४, डहाणु येथे १२ तर, गोंदिया येथे १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात २९ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२९ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सातारा, सांगली जिल्ह्यातील घाट परिसरात २९ व ३० जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.