बाळासाहेबांच्या पार्थिवावरून दोन सेनांमध्ये वाक् युद्ध; ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:19 IST2025-10-04T09:18:31+5:302025-10-04T09:19:43+5:30
उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा : रामदास कदम; ज्यांनी मोठे केले त्यांच्याशी ही बेइमानी : राऊत

बाळासाहेबांच्या पार्थिवावरून दोन सेनांमध्ये वाक् युद्ध; ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने!
मुंबई : उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाचा दोन दिवस छळ केल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला. हे खरे की खोटे हे कळण्यासाठी उद्धव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही त्यांनी केली. कदमांच्या आरोपामुळे उद्धवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. ज्या बाळासाहेबांनी तुम्हा-आम्हाला मोठे केले त्यांच्याशी ही बेईमानी असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी कदमांवर केली आहे.
शिंदेसेनेच्या मेळाव्यात कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच त्यांनी पत्रपरिषदेतून जे बोललो त्यावर ठाम असून, ते बदलणार नाहीत. त्यावेळच्या डॉक्टरांना विचारा. सगळा विषय संपेल. बाळासाहेब दैवत असून, त्यांच्या पायाचे ठसे घेण्यास सांगितले असता उद्धव यांनी हाताचे ठसे घेतल्याचे सांगितले. त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला हे जनतेला कळाल्यास उद्धव काय आहेत ते महाराष्ट्राला कळेल, असा सूचक इशारा दिला.
कदम यांच्या आरोपावर खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात आम्ही मातोश्रीवर शेवटपर्यंत होतो. त्यावेळी तिथे नसणाऱ्यांच्या तोंडात कुणीतरी काही कोंबले असेल. भीतीमुळे ते आता काही बोलत असतील तर काय करणार? शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक लोटले. त्यांचे आता जन्मशताब्दी वर्ष येईल. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या स्मृतींचा अपमान करणारे वक्तव्य आहे, अशी टीका त्यांनी केली. सावली बार बंद झाल्यामुळे कदमांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्या वक्तव्याला कोणीच किमत देत नाही, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कदम यांना काहीतरी मानसिक आजार झाला असून, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूच्या अत्यंत संवेदनशील विषयावर खोटा आरोप केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली. तर, आमदार अनिल परब यांनी डॉ. जलील पारकर यांच्या नावाने कदमांनी केलेला दावा सिद्ध करावा. त्यांच्याविरोधातील संघर्ष सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.